महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ग्लोबल वार्मिंगची समस्या तीव्र होत असताना एका तरुणाच्या मनात पर्यावरण संवर्धनाचे बीज अंकुरते. केल्याने होत आहे रे म्हणत त्यांनी स्वत:हून रोपांची लागवड केली. आणि पर्यावरण बचावची हाक देत सायकलवरुन प्रवास सुरू केला. रोज सायकलने प्रवास, नवा प्रांत, नवी माणसं. पण प्रत्येक ठिकाणी ‘झाडे लावा…झाडे जगवा’असे आवाहन करत आतापर्यत २४ हजार किलो मीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. सायकवलवरुन देशभ्रमंती करणारा हा मुसाफिर आहे, राजस्थानामधील नागोरी येथील पप्पू राम चौधरी. तो, सायकलवरुन साठ हजार किलो मीटरचा प्रवास करत देशभ्रमंती करणार आहे.
पप्पू राम हा २३ व २४ जुलै २०२४ रोजी कोल्हापुरात पोहोचला. २५ जुलै रोजी तो बेळगावकडे रवाना होणार आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्याचा सायकलप्रवास उलगडला. महाराष्ट्र आणि कोल्हापूरचा अनुभव हा वेगळा आहे. मी, राजस्थानामधील. आमच्याकडे पाऊस होतो, पण कोल्हापूरसारखा नाही. असा प्रचंड पाऊस मी पहिल्यांदाच अनुभवत आहे. तेज हवा, जोरदार पाऊस, हवेत गारठा हे सारं काही माझ्यासाठी वेगळं असल्याचे त्यांनी नमूद केले. कोल्हापुरात रोटरी क्लब ऑफ सनराईजतर्फे त्याचे स्वागत करण्यात आले. त्याच्या या प्रवासासाठी सनराईज कोल्हापूरकडून दहा हजार रुपयांची मदत केली. पप्पू राम हा रोटरी परिवाराचा सदस्य आहे.
क्लबचे अध्यक्ष दीपेश वसा, सचिव योगेश रास्ते, रोटरीचे पीजीडी नासिर बोरसदवाला, सनराईजचे सिद्धार्थ लाटकर, राहूल कुलकर्णी, एम. बी. शेख, प्रसन्न देशिंगकर, गौरव शहा, अॅड. अभय बिचकर, सचिन पटेल आदींनी पप्पू रामला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना पप्पू राम म्हणाला, ‘पर्यावरण संवर्धन हा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर स्थानिकांना एक रोप भेट देतो. रोपाची लागवड करा असा आग्रह धरतो. आतापर्यंत त्यांनी पाच हजा रोपांची लागवड केली आहे. या देशभ्रमंतीत प्रत्येक राज्याची राजधानी, त्या राज्यातील उंच शिखर या ठिकाणी भेट देतो.
२३ एप्रिल २०२३ रोजी त्याच्या सायकल प्रवासाला सुरुवात झाली. आतापर्यंत राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मिर, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट् असा प्रवास केला आहे. लदाखमधील प्रवास हा जोखमीचा होता. जवळपास साडे तीन महिने आणि साडेतीन हजार किलो मीटरचा प्रवास हा कसोटी पाहणारा ठरला असे त्यांनी सांगितले. २०२६ पर्यंत तो सायकवरुन साठ हजार किलो मीटरचा प्रवास करणार आहे. रोज सुमारे ८० किलो मीटरचा प्रवास होता. काही वेळेला १५० किलो मीटर अंतर पार करतो. देशभ्रमंती झाल्यानंतर भारत ते लंडन असा प्रवास सायकलने करायचे ठरविले. एव्हरेस्ट सर करण्याची तयारी करत आहे.