महायुतीला लाभलेले यश म्हणजे कोल्हापूरच्या जनतेचा विजय-महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना
schedule24 Nov 24 person by visibility 99 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवले. जिल्हा आणि राज्य पातळीवर सर्वत्र महायुतीचा डंका वाजला. जिल्ह्यातील दहापैकी दहा जागा महायुतीने जिंकल्या. या पार्श्वभूमीवर महायुतीतील पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. भाररतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीतील यश म्हणजे कोल्हापूरच्या जनतेचा विजय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या निवडून आल्याने मोठ्या विजयाच्या वल्गना करणाऱ्या जिल्ह्यातील काँग्रेसचा सुपडासाफ झाला अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील – गेल्या पाच दहा वर्षात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यात राजकीय दहशतवाद निर्माण केला होता. त्याविरोधात मतदारांमध्ये सुप्त लाट होती. त्यांनी विविध यंत्रणेचा गैरवापर करुन नागरिकांना त्रास दिला. लोकांना सामाजिक, आर्थिक त्रास दिला. या निवडणुकीतील कोल्हापुरातील राजकीय दहशतवाद संपला.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष् सुजित चव्हाण – छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचा वारसा लाभलेली ही नगरी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचाराला साथ देणारे हे शहर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने लोकांच्या हिताचा कारभार केला. कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी महायुतीच्या उमेदवारांना मतांच्या माध्यमातून आशीर्वाद दिला. जिल्हा काँग्रेसमुक्त केला.
भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव - महायुतीच्या अडीच वर्षाच्या या कार्यकाळामध्ये सरकारने विविध कल्याणकारी योजना जाहीर केल्या त्यांची अंमलबजावणी केली आणि त्या सर्व घटकांना त्याचा लाभ देखील मिळवून दिला, लाडकी बहिण योजना लोकप्रिय ठरली. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या भावांना भरभरून प्रेम दिले.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातू महायुती सरकारने जनकल्याणाच्या योजना राबविल्या. त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा जनतेने मोठा विश्वास दाखविला. जिल्ह्यातही दहा जागा महायुतीच्या बाजूने आहेत. महायुतीतील सगळे घटक एकजुटीने काम केले. आता सरकारच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवू.
भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव - कोल्हापूरच्या जनतेने जे भरभरून यश दिले त्याबद्दल जनतेचे आभार मानतो याची येथे परतफेड विकास कामाच्या माध्यमातून केली जाईल त्याचबरोबर लाडक्या बहिणींनी आज जी ओवाळणी विजयाच्या रूपात दिली ती कधीही हे सरकार विसरणार नाही.
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील - महायुती सरकारने राज्यामध्ये केलेल्या विकासाचे काम, शेतकऱ्यांच्यासाठी केलेली मोफत वीज योजना, युवकांच्यासाठी केलेल्या विविध योजना ' आणि विशेषता लाडक्या बहिणीसाठी आणलेली योजना, या योजनांमुळे महायुतीच्या सरकारवरचा विश्वास वाढला.हा विजय कोल्हापूरच्या जनतेचा आहे.