आरटीई 25 टक्के अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया
schedule16 Feb 26 person by visibility 70 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 2026-27 या शैक्षणिक वर्षामधील पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीसाठी 25 टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सतरा फेब्रुवारी ते दहा मार्च 2026 या कालावधीत वंचित व दुर्बल घटकांतील मुलांच्या प्रवेशासाठी पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील इच्छुक पालकांनी RTE पोर्टलवर या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी केले आहे.
कालावधीनंतर ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सर्व अर्ज रद्द केले जातील. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये अल्पसंख्यांक शाळा वगळता राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयं अर्थसहाय्यता तत्वावरील प्राथमिक शाळांना पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 टक्के पर्यंतच्या जागांवर नजिकच्या परिसरातील वंचित, दुर्बल घटकांतील बालकांच्या प्रवेशासाठी राखून ठेवणे व अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविण्यात येईल.
आरटीई अंतर्गत 25 टक्के आरक्षण मधून प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे-
जन्माचे प्रमाणपत्र (सर्व घटकांना अनिवार्य)- ग्रामपंचायत/न.पा./ म.न.पा. यांचा दाखला/ रुग्णालयातील ANM रजिस्टर मधील दाखला/ अंगणवाडी / बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला.
निवासी पुरावा (सर्व घटकांना अनिवार्य)- रेशनिंग कार्ड / आधार कार्ड / ड्रायव्हींग लायसन्स / प्रॉपर्टी टॅक्स देयक / घरपट्टी / राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक / पासपोर्ट / मतदान ओळखपत्र / वीज बिल / पाणी बिल / टेलिफोन बिल इ. यापैकी कोणतेही एकही कागदपत्रे नसतील तरच दुय्यम निबंधक कार्यालयाचा किमान 11 महिन्यांचा नोंदणीकृत भाडे करारनामा ग्राह्य धरण्यात येईल, भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असणे गरजेचे आहे.
सामाजिक वंचित घटक (एससी, एसटी, व्हीजीए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी ओबीसी एसबीसी ) यांच्यासाठी वडीलांचा / बालकाचा जातीचा दाखला / प्रमाणपत्र- उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. तहसिलदार / उपजिल्हाधिकारी / उपविभागीय महसुल अधिकारी यांनी निर्गमित केलेले पालकांचे (वडीलांचे / बालकाचे) जातीचे प्रमाणपत्र, परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला (1 लाख रु.पेक्षा कमी उत्पन्नाचा)- आर्थिक वर्ष सन 2023-24 किंवा 2024-25 या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेला तहसिलदार यांचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल. घटस्फोटीत अथवा न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे- 1) न्यायालयाचा निर्णय अथवा प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, 2) बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा, 3) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे अनिवार्य राहतील.
विधवा महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे- 1) पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, 2) बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा, 3) बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे अनिवार्य राहतील.एकल पालकत्व असल्यास आवश्यक कागदपत्रे- संबंधित बालकाचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीची आवश्यक कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील.अनाथ बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे- अनाथ बालकांच्या बाबत अनाथालयाची / बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील. इतर कागदपत्र उदा. वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेतला जाणार नाही.
एच.आय.व्ही. बाधित / कोव्हिड बांधित/ प्रभावित बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे- जिल्हा शल्य चिकित्सक / वैद्यकीय अधिक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील.दिव्यांग बालाकांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र - जिल्हा शल्यचिकित्सक / वैद्यकीय अधिक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र.आधार कार्ड (पालक व बालक यांचे)- पालकांचे (आई किंवा वडील) आधारकार्ड असणे आवश्यक. बालकाचे आधारकार्ड नसल्यास आधारकार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधिन राहून बालकास तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या बालकाचे आधारकार्ड शाळेकडे सादर करणे बंधनकारक. अन्यथा बालकाचा तात्पुरता प्रवेश रद्द करण्यात येईल.
बालकांच्या पालकांनी आरटीई 25 टक्के अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरतेवेळी पुढील कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.बालकांच्या पालकांचे आई किंवा वडीलांचे आधारकार्ड अनिवार्य (अनाथ बालक असल्यास जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे आधारकार्ड अनिवार्य), बालकांच्या जन्माचे प्रमाणपत्र (अनिवार्य), वास्तव्याचा पुरावा (अनिवार्य), भाडेतत्त्वावर राहणा-या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत भाडेकरार नाम्याची प्रत आवश्यक (सर्व घटकांना अनिवार्य), सामाजिक वंचित घटक (पालकांचा / बालकांचा जातीचा दाखला अनिवार्य) (परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही), दिव्यांग बालकांच्या बाबतीत अपंगत्वाचे प्रमाणपत्र अनिवार्य, आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांच्या उत्पन्नाचा दाखला रूपये एक लाखापेक्षा कमी उत्पन्न (सन 2023-24 किया 2024-25) या वर्षातील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य समजण्यात येईल.