शिवाजी विद्यापीठाच्या पूर्णवेळ कुलगुरु निवडीसाठी प्रक्रिया सुरू, २७ जानेवारीपर्यंत मागविले अर्ज
schedule23 Dec 25 person by visibility 49 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुपदाच्या निवडीसाठी प्रक्रियेला सुरुवात झाली. कुलगुरु शोध समितीने यासंदर्भातील कार्यक्रम जाहीर करताना २७ जानेवारी २०२६ पर्यंत कुलगुरुपदासाठी अर्ज मागविले आहेत. त्यादिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. यापदासाठी इच्छुक असलेल्यांनी किमान पन्नास पानामध्ये आपली माहिती सादर करायची आहे. हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपीमध्ये माहिती द्यायची आहे. यासाऱ्या प्रक्रियेसाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरुपद सात ऑक्टोबर २०२५ पासून रिक्त आहे. तत्कालिन कुलगुरू डी. टी. शिर्के यांचा सहा ऑक्टोबर २०२५ रोजी कुलगुरुपदाचा कालावधी संपला. त्यानंतर कुलपती कार्यालयाकडून चार दिवसानी शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदाचा कार्यभार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे सोपविला. डॉ. गोसावी यांनी ११ ऑक्टोबर रोजी शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारला. आता कुलगुरुपदासाठी शोध व निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामुळे नजीकच्या सहा महिन्याच कालावधीत शिवाजी विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरु मिळतील अशी चिन्हे आहेत. दरम्यान शिवाजी विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू नेमावा यासाठी चार दिवसापूर्वी सिनेट सदस्यांनी आंदोलन केले होते.