टेंबलाईवाडी विद्यामंदिराची कमाल ! ५० विद्यार्थी उत्तीर्ण- २४ जण गुणवत्ता यादीत !!
schedule04 Jan 23 person by visibility 2971 categoryसंपादकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : टेंबलाईवाडी विद्यामंदिर कष्टकरी व सामान्य कुटुंबातील मुलांची शाळा. मात्र शाळेने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कमाल केली. मुलांची जिद्द, शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेचे अकॅडमिक प्लॅनिंग, शिक्षकांचे उत्तम नियोजन व योग्य मार्गदर्शन या चतुसूत्रीच्या बळावर टेंबलाईवाडी विद्या मंदिराचे तब्बल पन्नास विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले. तर पाच विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत व १९ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत. एकूण २४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आहेत. टेंबलाईवाडी विद्यामंदिरातील मुलांच्या या कौतुक सोहळ्याचे खरे शिल्पकार ठरले आहेत, ते म्हणजे शिक्षिका पुष्पा सुभाष गायकवाड, शिक्षक दिग्विजय नाईक. आणि या दोन शिक्षकांना प्रोत्साहित करणारे मुख्याध्यापक विलास पिंगळे. या तिघांच्या संयुक्तिक प्रयत्नामुळे टेंबलाईवाडी विद्या मंदिराने शिष्यवृत्ती परीक्षेत आतापर्यंतचे सर्वाधिक यश मिळवले. मुख्याध्यापक पिंगळे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या शिक्षकांना पूर्ण मोकळीक दिली. त्यांच्या प्रत्येक शैक्षणिक उपक्रमाला प्रोत्साहित केले. ज्या ज्या वेळी अडचणी उदभवल्या त्यावेळी मुख्याध्यापक पिंगळे यांनी पुढाकार घेऊन त्या अडचणींची सोडवणूक केली.
पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यामंदिराने पन्नास विद्यार्थ्यांचा स्वतंत्र वर्ग केला होता. या वर्गाची जबाबदारी शिक्षिका पुष्पा गायकवाड व शिक्षक दिग्विजय नाईक यांच्याकडे सोपवली होती. शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी, विद्यार्थ्यांचे परीक्षेतील यश यासंबंधी बोलताना शिक्षिका पुष्पा गायकवाड म्हणाल्या, "शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पन्नास मुलांचा स्वतंत्र वर्ग होता. वर्षभर अभ्यासाक्रमाचे नियोजन केले होते. वर्षभर एकही सुट्टी घेतली नाही. दसरा दिवाळी आणि सण समारंभातही शिष्यवृत्तीचे वर्ग सुरू होते. सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या वर्गाला हजर असायचे. त्यामुळे परीक्षेची उत्तम तयारी झाली. मुलांमध्ये रमलं, एकरूप झालं, त्यांच्यातील हुशारी ओळखून योग्य मार्गदर्शन केलं तर निश्चितपणे मुले चमकतात. टेंबलाईवाडी विद्यामंदिराला जे घवघवीत यश मिळाले त्याचे सारे श्रेय विद्यार्थ्यांनाच आहे."
पुष्पा गायकवाड २००५ पासून महापालिकेच्या शाळेत सेवेत आहेत. हिंद विद्यामंदिर येथे पाच वर्षे नोकरी केल्यानंतर २०१० मध्ये टेंबलाईवाडी विद्यामंदिर येथे रुजू झाल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०१७ मध्ये दहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. यंदा शिष्यवृत्ती परीक्षेत ज्या वर्गाने यश मिळवले आहे, त्या वर्गाच्या गायकवाड या पहिलीपासून वर्गशिक्षिका होत्या.सध्या त्या जरगनगर विद्यामंदिर येथे आहेत.
टेंबलाईवाडी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक विलास पिंगळे म्हणाले, " टेंबलाईवाडी विद्यामंदिरात सामान्य कुटुंबातील मुले आहेत. या मुलांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. पालकांनी दाखवलेला विश्वास, मुलांची तयारी आणि शिक्षकांचे कष्ट यामुळेच हे यश शक्य झाले. यशाचे खरे श्रेय या तीनही घटकांना आहे. शिक्षकांनी वर्षभर सुट्टी न घेता शिष्यवृत्तीचे वर्ग घेतले."