केशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापनासाठी बाह्य संस्थेला देण्यासाठी महापालिकेला घाई ! वीस मिनिटाच्या चर्चेअंती ठराव मंजूर ! !
schedule20 Jul 26 person by visibility 51 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: राजर्षी शाहू महाराज यांच्या सांस्कृतिक कार्याचे स्मारक, कोल्हापूरची अस्मिता, कलाकरांचे हक्काचे व्यासपीठ अशी ओळख असलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापनासाठी बाह्य संस्थेला देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. अवघ्य वीस मिनिटाच्या साधकबाधक चर्चेअंती सभागृहाने या विषयाला मंजुरी दिली. ‘रंगकर्मीनी हा नाट्यगृह चालवायला घ्यावा’अशी सूचना सभागृहात झाली. महापौर रुपाराणी निकम सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. नाट्यगृह व्यवस्थापनसाठी बाह्य संस्थेला देणे म्हणजे नाट्यगृहाचे खासगीकरण नव्हे अशी पुस्तीही सभागृहातील काही सदस्यांनी जोडली. ‘ना नफा ना तोटा या तत्वावर नाट्यगृह चालवावे. सगळया घटकांना परवडेल अशा पद्धतीची भाडे आकारणी करावी आणि नाट्यगृहावर महापालिकेचे नियंत्रण कायम असावे.’अशा सूचना नगरसेवकांनी केल्या.
नाट्यगृहाचे नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तत्पूर्वीच महापालिका प्रशासनाने नाट्यगृह व्यवस्थापनसाठी बाह्य संस्थेला देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेसमोर आणला. यावरुन रंगकर्मीनी विरोध दर्शविला. नाट्यगृहाचे खासगीकरण करू नये अशी रंगकर्मीची मागणी आहे. दरम्यान प्रशासनाकडून हा ठराव मंजुरीसाठी सोमवारच्या सर्वसाधारण सभसेमोर मांडला. आयुक्त राजेंद्र भारुड यांनी महापालिकेचा उद्देश स्पष्ट करताना, ‘शहरवासियांना नाटयगृहाच्या चांगल्या सुविधा मिळायला पाहिजेत, उत्तमरित्या व्यवस्थापनरित्या झाले पाहिजे. तांत्रिक बाजू सांभाळणारे कुशल तंत्रज्ञ हवेत या साऱ्या बाबी विचारात घेऊन नाट्यगृह व्यवस्थापनासाठी बाह्य संस्थेला देण्याचा ठराव मांडला आहे. प्रशासनाला लोकभावनेचा आदर आहे.दरम्यान बाह्य संस्थेला व्यवस्थापनला दिल्यानंतर महापालिकेला वर्षाला साठ लाखाहून अधिक उत्पन्न मिळणार आहे असे सांगितले. सायबरच्या आनंदभवनसाठी एक लाख रुपये भाडे आहे, देवल क्लबच्या सभागृहाचेही भाडे हजारोंच्या पटीत आहे. नाट्यगृहाचे भाडे किती असावे यासंबंधी चर्चा करु. पन्नास हजार रुपये ठेवायचे की कमी करायचे याविषयी निर्णय घेऊ असे आयुक्तांनी सांगितले. या चर्चेत सहभागी होताना काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी, ‘केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूरची अस्मिता आहे. तो चालवायला खासगी संस्थेला देण्याचा घाट कशासाठी’असा सवाल केला. नगरसेवक राहूल माने यांनी बाह्य संस्थेला व्यवस्थापनसाठी देणे योग्य ठरेल का असा प्रश्न केला. तसेच योग्य भाडे ठरवावे असे सुचविले. नगरसेवक सुनील मोदी यांनी, रंगकर्मीची काही विषय आहेत, त्यांच्याशी चर्चा करुन पुढील निर्णय घ्यावा.रंगकर्मीना परवडले पाहिजे’असे सांगितले.
‘नाट्यगृह चालवायला दिले जात नाही. त्याचे खासगीकरण केले जाणार नाही. ते फक्त बाह्य संस्थेला व्यवस्थापनसाठी देण्याचा प्रस्ताव आहे.’असे प्रा.जयंत पाटील यांनी सांगितले.रंगकर्मीच्या नाट्यगृहाविषयी काही भावना आहेत. तेव्हा बाह्य संस्थेला ते देण्यापेक्षा रंगकर्मीनीच नाट्यगृह चालवावे असे सुचविले. महापौर निकम म्हणाल्या, ‘नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी तीस कोटीहून अधिक रक्कम खर्ची झाली आहे. नाट्यगृहाच्या देखभाल व व्यवस्थापनाचा विषय मोठा आहे. असे सांगत बाह्य संस्थेला व्यवस्थापनासाठी देणे योग्य ठरेल असा सूर लावला. भाडे आकारणी जास्त होते असे म्हणणाऱ्यांनी फुकट नाटके लावावीत असेही त्या म्हणाल्या. चर्चेदरम्यान प्रा. पाटील यांनी नऊ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते उद्घाटन करु या. उर्वरित कामे नंतर करता येतील असे सुचविले. त्यावर नगरसेवक मोदी यांनी घाई गडबडीने उद्घाटन नको. नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम अजून तीन महिने पूर्ण होणार नाही असे स्पष्ट केले.