संत तुकारामांचे अभंग हे केवळ भक्तीपर नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन – डॉ. जी. पी. माळी
schedule05 Mar 26 person by visibility 26 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ संत तुकारामांचे अभंग हे केवळ भक्तीपर नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन आहे. समाजातील अंधश्रद्धा, जातिभेद, अन्याय आणि दांभिकपणा व कर्मकांड यावर तुकारामांनी कठोर शब्दांत प्रहार केला. त्यांच्या विचारांमध्ये समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश स्पष्टपणे दिसून येतो.’असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. जी.पी. माळी यांनी केले.
महाराष्ट्रातील अग्रगण्य महिला विद्यापीठ असलेले ताराराणी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यावतीने गुरुवारी (पाच मार्च २०२६ ) ‘तुकाराम बीज’ सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या अंतर्गत ‘प्रबोधनकार संत तुकाराम’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एस.एन. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘प्रबोधनकार संत तुकाराम’ या विषयावर प्रभावी मार्गदर्शन करताना डॉ. माळी यांनी, संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे आधुनिक संदर्भात महत्त्व अधोरेखित केले. ‘तुकारामांची भक्ती ही कृतीशील होती; ती केवळ मंदिरापुरती मर्यादित नव्हती, तर समाजपरिवर्तनाशी निगडित होती. तुकाराम महाराज यांच्या प्रबोधनाचा विचार महाराष्ट्र व देशाच्या पुनर्रबांधणीसाठी आवश्यक आहे. वारकरी परंपरा समाजात ऐक्य आणि सदभावना निर्माण करणारी आहे. संत साहित्य हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे अधिष्ठान आहे. आजच्या स्पर्धात्मक जीवनात संत तुकारामांच्या साधेपणाचा व नैतिकतेचा आदर्श सर्वांनी स्वीकारण्याची गरज आहे.’असे माळी यांनी नमूद केले. कार्यक्रमाची सुरुवात संत तुकाराम यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी उषाराजे हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी संत तुकाराम यांचा अभंग सादर करून वातावरण भक्तिमय केले. प्रा. डॉ. सुजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. सोनाली चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. सुधाराणी पाटील यांनी आभार मानले.