शाश्वत विकास- सुरक्षेसाठी तंत्रज्ञान अनिवार्य : कुलगुरू कारभारी काळे
schedule01 Nov 25 person by visibility 77 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ' शाश्वत विकास आणि सुरक्षेसाठी तंत्रज्ञान अनिवार्य असून , तंत्रज्ञानाच्या विकासासाठी परिषद यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नवसंशोधकांनी निरीक्षण , श्रवण, लेखन आणि अभ्यास वृद्धिंगत करून कौशल्यपूर्ण व्हावे आणि समाज सक्षम करावा ' असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे(लोणेरे) कुलगुरू प्रा. डॉ. कारभारी काळे यांनी केले.
डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (पुणे सेक्शन, मुंबई सेक्शन) , कॉम्प्युटर सोसायटी ऑफ पुणे त्यांच्या संयुक्त विद्यमाने ' इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ब्लॉकचेन डिस्ट्रीब्यूटेड सिस्टिम्स ॲन्ड सिक्युरिटी ' या तीनदिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या परिषदेसाठी सात देशातील तब्बल १०८९ संशोधकांचे शोधनिबंध परिषदेसाठी प्राप्त झाले आहेत.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे म्हणाले, "ब्लॉकचेन तंत्रज्ञानाने डिजिटल नव्याने व्याख्या केली आहे. डिस्ट्रीब्यूटेड सिस्टिममुळे पारदर्शकता आणि विश्वास यांच्या बाबतीत तोडजोड होऊ नये, यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे. सहकार्यातून संशोधन, विचारांचे आदान प्रदान, कटिंग- एज रिसर्च यांसाठी या कॉन्फरन्समुळे प्लॅटफॉर्म मिळाला आहे." डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे (पुणे विद्यापीठ)कुलगुरू आणि आयईईई कॉम्प्युटर सोसायटी पुणे चॅप्टरचे चेअरमन डॉ. राजेश इंगळे यांनी आंतरराष्ट्रीय परिषदांची प्रासंगिकता, आवश्यकता, संशोधनातील संवाद, प्रशिक्षण यावर भाष्य केले. आयईईई पुणे चॅप्टरचे चेअरमन डॉ. अमर बुचडे, डॉ. विनित कोटक यांनी चर्चासत्रात मार्गदर्शन केले.
परिषदेचे अध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे म्हणाले, " ज्ञान आणि कृती यांची सांगड आवश्यक असून अभ्यासकांचे चिंतन समाजाला चालना देते. तंत्रज्ञानातून विश्वशांती या उद्देशासाठी संशोधकांनी कृतिशील रहावे '. जपान सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागातील शास्त्रज्ञ डॉ. वैभव मेहता, ऑस्ट्रेलियातील पर्थ विद्यापीठातील संशोधक डॉ. विद्यासागर पोतदार , संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, संचालक प्राचार्य विरेन भिर्डी उपस्थित होते. इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी आभार मानले