अधिकाऱ्यांची नकारात्मकता अन् संतप्त पालकमंत्री ! आबिटकरांनी बैठकीतच दिले शहर अभियंत्यांच्या पदमुक्तीचे आदेश !!
schedule01 Nov 25 person by visibility 94 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या विविध विकासकामाच्या आढावा बैठकीत महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांचा नकारात्मक दृष्टिकोन समोर येताच पालकमंत्री प्रकाश आबिटकर संतप्त झाले. महापालिकेचा डांबरी प्लांट सुरू करण्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल शहर अभियंता रमेश मस्कर यांना पदमुक्त करा अशा सक्त सूचना पालकमंत्री आबिटकर यांनी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना केली.
पालकमंत्री आबिटकर,राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी सायंकाळी आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत शहर विकासाच्या विविध प्रकल्पावर, दर्जेदार रस्ते बांधणी यासंबंधी सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत मंत्री आबिटकर यांनी महापालिकेच्या मालकीचा डांबरी प्लांट आठ दिवसात सुरू करण्यासंबंधी यापूर्वी सूचना केल्या होत्या. त्या प्रकल्पाचे काय झाले ? अशी विचारणा केली. त्यावर शहर अभियंता रमेश मस्कर यांनी, ‘डांबरी प्लांट सुरू करण्यासाठी दोन ते अडीच महिन्याचा कालावधी लागतो. त्यासाठी अडीच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.’अशी विचारणा केली. डांबरी प्लांट अद्याप सुरू झाला नाही हे निदर्शनास येताच त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
आबिटकर म्हणाले, ‘विकास योजनांची अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांची मानसिकता सकारात्मक हवी. डांबरी प्लांट अभावी किरकोळ स्वरुपातील रस्ता दुरुस्तीला विलंब लागतो. म्हणून डांबरी प्लांट सुरू करा अशा सूचना केल्या होत्या. डांबरी प्लांट सुरू करण्यासंबंधी कसल्याच हालचाली अद्याप दिसत नाहीत. नकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करणारे शहर अभियंता हे महापालिकेत कशाला हवेत ? त्यांना पदमुक्त करा. जबाबदारीने काम करायला तयार नसणाऱ्या अधिकाऱ्यांना बाजूला करा. येत्या आठ दिवसात डांबरी प्लांट सुरू झाला पाहिजे. जे धडाडीने, प्रामाणिकपणे काम करतात त्या अधिकाऱ्यांच्याकडे पदे सोपवा.’अशी तराटणीच आबिटकर यांनी दिली. शिवाय त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना डांबरी प्लांटसाठी किती खर्च येऊ शकतो ? असे विचारले. त्यावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सत्तर लाख रुपयात डांबरी प्लांट सुरू होऊ शकतो असे सांगितले. त्यावरुन आबिटकर यांनी मस्कर यांना चांगलेच सुनावले.‘प्रत्येक कामात टाळाटाळ आणि नकारात्मक बोलणारे सिटी इंजिनीअर कशाला हवेत ? बांधकाम विभाग ७० लाखात डांबरी प्लांट सुरू करू शकतो तर तुम्हाला अडीच कोटी कशाला हवेत ? प्रत्येक काम अशाच पद्धतीने करता का ?’ अशा शब्दांत त्यांनी मस्कर यांची खरडपट्टी काढली.