राष्ट्रवादीच्या अश्वमेधला भाजपकडूनच ब्रेक, चंद्रकांत पाटलांकडून शरद लाडची उमेदवारी घोषित ! मुश्रीफ समर्थक भैय्या मानेंचे वाढले टेन्शन !!
schedule01 Nov 25 person by visibility 366 categoryराजकीय
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : पुणे पदवीधर मतदारसंघातून भैय्या माने यांचा अश्वमेध सोडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी मिळवून आणणार आणि महायुतीकडून भैय्या माने यांना आमदार करणार…मंत्री हसन मुश्रीफ यांच्या या राणा भीमदेवी थाटातील घोषणेला भारतीय जनता पक्षाकडूनच ब्रेक लागण्याच्या हालचाली वेगावल्या आहेत. कारण पुणे पदवीधर मतदारसंघातील लढत भाजपने प्रतिष्ठेची बनविली आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (३१ ऑक्टोबर २०२५) सांगली जिल्ह्यातील पलूस येथील कार्यक्रमात पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड हेच उमेदवार असतील अशी अनौपचारिक घोषणा केली. मंत्री पाटील यांच्या विधानाने पुणे पदवीधरमधील उमेदवारीवरुन भाजप आणि राष्ट्रवादी रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. दोन्ही पक्षाची सध्याची तयारी पाहता पुणे पदवीधरमध्ये महायुतीमध्येच मैत्रीपूर्ण लढतीचे चिन्हे दिसत आहेत.
पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्हयाचे कार्यक्षेत्र पुणे पदवीधर मतदारसंघात आहे. या मतदारसंघात गेल्या सहा निवडणुकीपैकी चार वेळा भाजपाने बाजी मारली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी २००८ आणि २०१४ मधील निवडणुकीत दोनदा विजय मिळवला. २०२० मधील निवडणुकीत भाजपाला या निवडणुकीत हार पत्करावी लागली. त्यावेळी महाविकास आघाडीतंर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी पुणे पदवीधरची लढत जिंकली. दरम्यान गेल्या पाच वर्षात राज्यातील राजकारणात उलथापालथ झाली. पहिल्यांदा शिवसेना, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली.
आता राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून पुणे पदवीधरची जय्यत तयारी सुरू आहे. मंत्री मुश्रीफ यांचे समर्थक व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने यांनी मतदार नोंदणी झपाटयाने सुरू केली आहे. मंत्री मुश्रीफ यांनीच माने यांना उमेदवारी मिळवून देऊ व त्यांना निवडून आणून आमदार करणार अशी घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची संपूर्ण यंत्रणा आणि त्यांच्या ताब्यातील संस्थांनी सध्या माने यांच्यासाठी पदवीधर नोंदणी हेच मिशन ठेवले आहे.
सध्या पुणे पदवीधरची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने महायुती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वाटयाला येईल असा मंत्री मुश्रीफ व त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. मुश्रीफ यांनीच पुणे पदवीधरमधून भैया माने यांचा अश्वमेध सोडला आहे, त्यांना उमेदवारी मिळवून देऊ आणि आमदार ही करू असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. तर धक्कातंत्रात तरबेज असणाऱ्या भाजपनेही पुणे पदवीधर हा मतदारसंघ पुन्हा पक्षाच्या झेंडयाखाली आणण्याचा चंग बांधला आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. यामुळे हा मतदारसंघ पुन्हा भाजपचा बालेकिल्ला आहे हे सिद्ध करण्यासाठी भाजपची मंडळी सरसावली आहेत. प्रत्येक जिल्हानिहाय पदवीधर मतदार नोंदणीसाठी समन्वयक नेमले आहेत. शिवाय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदवीधरमधील आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांचा भाजप प्रवेश झाला आहे. उमेदवारीच्या अटीवरच त्यांचा भाजप प्रवेश झाला असल्याचे म्हटले जाते. शुक्रवारी पलूस येथे भाजपच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना पुणे पदवीधरमधून भाजपकडून शरद लाड हेच उमेदवार असतील असे जाहीर केले. यामुळे राष्ट्रवादीच्या अश्वमेधला भाजपकडूनच ब्रेक लावण्याची चिन्हे दिसत आहेत.