विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान -कौशल्यांचा उपयोग करावा : राज्यपाल जिष्णू देव वर्मा
schedule27 Nov 26 person by visibility 4 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘विद्यापीठांनी विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता, विश्लेषणात्मक विचारक्षमता, सर्जनशीलता, प्रभावी संवादकौशल्य आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्यावर भर द्यावा. तसेच भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवोन्मेष, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे. विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान, कौशल्यांचा उपयोग करावा,’ असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली व भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल जे.जे. सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता जिजाऊ सभागृहात पार पडला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजनीश कामत, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, प्रकुलगुरु डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखा अधिकारी सुहासिनी पाटील यांच्यासह अधिकार मंडळाचे सदस्य व्यासपीठावर होते. २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात क्रीडा, बौद्धिक, कला क्षेत्र, एन.सी.सी., एन.एस.एस. मध्ये गुणवत्ता तसेच सर्वसाधारण कौशल्यासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक तनुजा बाजीराव साळुंखे (एम.बी.ए. अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) या विद्यार्थिनीस बहाल केले. दीक्षांत सोहळ्यात साठ हजार २५० स्नातकांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येत असून यामध्ये ३४ हजार ६७० विद्यार्थिनी आहेत. एम.ए. (भाषा व सामाजिक शास्त्रे) अभ्यासक्रमामधून ‘मानसशास्त्र’ या विषयात सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल कुलपती सुवर्णपदक वेदिका उमेश कदम (कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, इस्लामपूर) या विद्यार्थिनीस तर पीएचडी पदवीधारक स्नातकातून सामाजिक कार्यात असाधारण योगदान दिलेल्या व्यक्तीस विशेष सन्मान श्रेणी डॉ. दीपक सावंत यांना देण्यात आले.
राज्यपाल वर्मा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देत असून त्यांच्या नावाने उभारलेल्या शिवाजी विद्यापीठाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत आहे. या विद्यापीठाने सहा दशकांहून अधिक काळ कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील गावे, शहरे आणि तालुक्यांपर्यंत उच्च शिक्षणाचा प्रकाश पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या प्रदेशाच्या विकासात विद्यापीठाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कोल्हापूर जिल्ह्यात औद्योगिक आणि आर्थिक विकासाची प्रचंड क्षमता आहे. या प्रदेशातील औद्योगिक आणि आर्थिक परिसंस्था अधिक बळकट करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने योगदान द्यावे. उद्योगक्षेत्रातील भक्कम भागीदारीमुळे नवोन्मेषाला चालना मिळत आहे. आता उत्पादकता वाढवण्यासाठी आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यासाठी विद्यापीठातील शैक्षणिक तज्ज्ञता आणि संशोधन क्षमतेचा उपयोग सहकारी संस्था, फौंड्री, अभियांत्रिकी, वस्त्रोद्योग तसेच जगप्रसिद्ध कोल्हापुरी चपलेशी संबंधित पारंपरिक कारागिरांच्या विकासासाठी व्हावा.
उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यापीठांना सज्ज करण्याच्या दृष्टिने राजभवनात 'फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी फोरम' सुरु करण्यात आला आहे. या फोरमचे नेतृत्व प्रा. डॉ. राजनीश कामत करत असल्याचे सांगून त्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.
भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल जे.जे. सिंग म्हणाले, सध्याच्या युवा पिढीमध्ये गुणवत्ता आणि प्रचंड क्षमता आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील ज्ञान आणि माहिती ते क्षणार्धात मिळवू शकतात. विद्यापीठाला तुमचा अभिमान वाटेल, असे कर्तृत्व गाजवा. आपले ज्ञान समाजाच्या कल्याणासाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोगी पडेल असे कार्य करा, असे आवाहन त्यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजनीश कामत यांनी प्रास्ताविकातून विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण वाटचालीबद्दल माहिती दिली.कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.