सत्तेच्या गडबडीसाठी मुश्रीफांनी जनतेला फसविले, वापरा व फेका ही त्यांची निती - संजय मंडलिकांचा हल्लाबोल
schedule18 Nov 25 person by visibility 203 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘मंत्री हसन मुश्रीफांना तहहयात आमदार राहायचं. म्हणून ते प्रत्येकवेळी नवीन युती, आघाडी करत असतात. वापरा व फेका ही त्यांची निती आलहे. सत्तेच्या गडबडीसाठी ते जनतेला फसवित आहेत.’असा हल्लाबोल माजी खासदार संजय मंडलिक यांनी केला.
कागल नगरपालिका निवडणुकीत मंत्री मुश्रीफ व शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्यातील युतीच्या अनुषंगाने प्रसारमाध्यमातील प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न केला असता ते मंडलिक म्हणाले, ‘मुश्रीफ मोठे होण्यात माजी खासदार सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे यांच्यासह अनेकांचे उपकार आहेत. यामुळे ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची जाणीव मुश्रीफांनी ठेवावी. मात्र त्यांची निती ही वापरा व फेका या पद्धतीची आहे. जी पायरी चढून यश मिळवले, त्या पायरीलाच छाटायचे असा त्यांचा प्रयत्न असतो. महायुतीचे घटक पक्ष म्हणून युती संदर्भात त्यांचा फोन येईल, चर्चा होईल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी सत्तेच्या गडबडीत जनतेला फसविले.
मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे यांच्या युतीमुळे मी एकटा पडलो नाही. तोंडघशीही पडलो नाही. कारण कागलमधील जनता माझ्यासोबत आहे. कागलमधील जनता सजग आहे. कागल नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या सगळया जागा शिवसेना लढविणार आहे. मुरगुडमध्ये आमची भाजपसोबत युती आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल. दोन तीन दिवसात काय घडामोडी होतात पाहू, कागल नगरपालिका निवडणुकीतही जनता आमच्यासोबत आहे. कागलमध्ये नव्याने आकाराला आलेली आघाडी लोकांना आवडली नाही. त्यांची आघाडी ही काही आमच्यासाठी राजकीय भूकंप नाही. वास्तविक कागलमध्ये कोणताही गट असो, निर्णय घेत असताना कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच पुढील धोरण ठरविले जाते. मात्र मुश्रीफांनी कसलीही चर्चा न करता आघाडी केल्याचे घोषित केले. नंतर माफीही मागितली म्हणतात. त्यांनी, सत्तेच्या गडबडीसाठी जनतेला फसविले.’अशा शब्दांत मंडलिकांनी मुश्रीफांवर निशाणा साधला.