नवीन राजवाडयात शिवराज्याभिषेक दिन सोहळा थाटामाटात
schedule07 Jun 26 person by visibility 20 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवछत्रपतींचा जयघोष, सुवर्णमूर्तीची पूजा, अंगावर रोमांच उभा करणारा पोवाडा, शिवपराक्रमाची महती सांगणारे व्याख्यान, वातावरण भारावून टाकणारा ढोल ताशा पथकाचा नाद आणि शिवभक्तांचा ओसांडून वाहणारा उत्साह अशा वातावरणात च्त्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा येथील नवीन राजवाडा येथे दिमाखात साजरा करण्यात आला. छत्रपती घराण्याच्यावतीने दरबार हॉलमध्ये हा सोहळा आयोजित केला होता.
खासदार श्रीमंत शाहू महाराज, याज्ञसेनीराजे महाराणी, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शनिवारी, (सहा जून २०२६ ) या सोहळयाची सुरुवात झाली.उपस्थितांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या सुवर्णमूर्तीची पूजा करण्यात आली. यशराजराजे छत्रपती यांच्या हस्ते राज् सदरेवरील शिवछत्रपतींच्या सुवर्णमूर्तीवर अभिषेक झाला. दरम्यान सकाळपासूनच न्यू पॅलेसचा परिसर शिवभक्तांनी गजबजला. करवीर नाद ढोल ताशा पथक, पोलिस बॅण्ड पथकाने वातावरण निर्मिती केली. शाहीर आझाद नायकवडी यांनी शिवपराक्रमावर आधारित पोवाडा सादर केला. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी व्याख्यानातून शिवराज्याभिषेक सोहळयाचे महत्व विषद केले.
या सोहळयाला आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव, जिल्हाधिकारी विजय भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मिन, सहदिवाणी न्यायाधीश शिवलिना शिंदे, बाळ पाटणकर, नीलराजे पंडित बावडेकर, अॅड. राजेंद्र चव्हाण, धैर्यशील यादव, स्वप्नील इंगळे, प्रणील इंगळे, कर्नल विजयसिंह गायकवाड, कर्नल अमरसिंह सावंत, लेफ्टनंट कर्नल विशाल रायजादा, कॅप्टन सनी कुमार, उपमहापौर अक्षय जरग, महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.