शिवसेनेकडे उमेदवारांची तगडी फौज ! राष्ट्रवादीतही वाजतगाजत मुलाखती ! !
schedule21 Dec 25 person by visibility 83 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मुलाखती आणि उमेदवारांच्या निवडी या प्रक्रिया सध्या सुरू आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारांनीही जंगी तयारी केली आहे. वाजतगाजत, शक्तीप्रदर्शन करत मुलाखतीत येत उमेदवारांनी आपणच कसे भारी आहोत हे दाखवित आहेत. शनिवारी, कोल्हापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या स्वतंत्र मुलाखती झाल्या. शिवसेनेकडे आमदार पुत्र, माजी महापौरांच्या पुत्रांसहित मातब्बर माजी नगरसेवकांनी उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत मुलाखती दिल्या.
नागाळा पार्क येथील शिवसेनेच्या संपर्क कार्यालय येथे दिवसभर मुलाखती झाल्या. माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव यांनी मुलाखती घेतल्या. या मुलाखतीच्या निमित्ताने संपर्क कार्यालय गजबजला. इच्छुक उमेदवारांनी समर्थक कार्यकर्ते, कुटुंबातील सदस्यासाठी कार्यालयात गर्दी केली होती. शिवसेनेकडे आमदार क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर, माजी आमदार जाधव यांचे चिरंजीव सत्यजीत जाधव, माजी महापौर सुनील कदम यांचे चिरंजीव स्वरुप कदम, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, नंदकुमार मोरे, माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे पती आश्किन आजरेकर, माजी महापौर सई खराडे यांचे चिरंजीव शिवतेज खराडे, स्थायी समितीचे माजी सभापती निशिकांत मेथे, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, परिवहन समितीचे माजी सभापती अजित मोरे, राहुल चव्हाण, रमेश पुरेकर, अनुराधा खेडकर, अर्चना पागर, अश्विनी बारामते यांच्यासह अनेक माज नगरसेवकांनी उमेदवारी मागितली आहे. चेतन मोहिते, दुर्गेश लिंग्रस, कुणाल शिंदे, अॅड. प्रमोद दाभाडे, अभिजीत सांगावकर, रणजित मंडलिक, सविता संजय पाटील, मदन चोडणकर, गजानन भुर्के, रुपाली बावडेकर, आदर्श सुनील जाधव, सचिन विलास पाटील कृष्णा लोंढे, यांच्यासह दिवसभरात २०० हून अधिक जणांच्या मुलाखती झाल्या.
मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, गोकुळचे संचालक युवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. शहराध्यक्ष आदिल फरास यांची उमेदवारी यापूर्वीच मंत्री मुश्रीफ यांनी जाहीर केली आहे. स्थायी समितीचे माजी सभापती महेश सावंत, सुनील पाटील, संदीप कवाळे, प्रकाश गवंडी, परीक्षित पन्हाळकर, नंदकुमार गुर्जर, प्रकाश काटे, अमोल माने आदींनी मुलाखत दिल्या. तसेच युवराज साळोखे, जहिदा मुजावर, शीतल तिवडे, योगिता कोडोलीकर, रेहाना नागरकट्टी, आरती साळोखे यांनी मुलाखती दिल्या.