महायुतीचा फॉर्म्युला ठरला ? २९ डिंसेबरपर्यंत उमेदवारांची घोषणा !
schedule20 Dec 25 person by visibility 16 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : इच्छुकांची मोठी संख्या, सगळयाच राजकीय पक्षांमध्ये झालेले इनकमिंग यामुळे स्वतंत्र लढायचे की महायुतीतर्फे असा पेच नेते मंडळीसमोर उभा ठाकला होता. लोकसभा व विधानसभेप्रमाणे महापालिका निवडणुकाही महायुतीतर्फे लढविण्यावर शिक्कामोर्तब झाले. कोल्हापूर महापालिकेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही जवळपास निश्चित झाला आहे. इचलकरंजी महापालिकेसाठी निवडणूक एकत्रित लढविण्याचे ठरले असून पुढील बैठकीत जागा वाटप निश्चित केले जाईल. साधारणपणे २९ व ३० डिसेंबर २०२५ पर्यंत उमेदवारी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा होणार आहे.
कोल्हापूर महापालिकेत २० प्रभाग आणि ८१ जागा आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हे तिघेही एकत्रित लढणार आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी झालेल्या बैठकीत जागा वाटपाबाबतही चर्चा झाली. इलेक्टिव्ह मेरीट हाच निकष मानून उमेदवारी हे सूत्र ठरले आहे. अशा सक्षम उमेदवारांची प्रभागनिहाय चाचपणी करण्यासाठी उपसमिती स्थापन केली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी ४० जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २५ जागा हव्यात असे ज्या त्या पक्षाचे नेते मंडळी सांगतात. मात्र त्या जागेवर अडून राहिल्यास जागा वाटपाची चर्चा पुढे जाणार नाही हे नेत्यांनाही ठाऊक आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीला बारापेक्षा अधिक जागा सोडायच्या नाहीत या मानसिकतेत भाजप, शिवसेना आहे. कोल्हापूर महापालिकेसाठी महायुतीमध्ये भाजपा ३३, शिवसेना ३३ आणि राष्ट्रवादी १५ या फॉर्म्युलाबाबत चर्चा झाली आहे. मात्र हा काही अंतिम फॉर्म्युला नाही. उपसमितीकडून चाचपणी झाल्यानंतर अधिकृत उमेदवारांची घोषणा होईल. त्यामध्येच जागा वाटपही जाहीर होणार आहे. उपसमितीने प्रभागनिहाय चाचपणी करुन नेत्यांना अहवाल सादर केला की २९ किंवा ३० डिसेंबरला उमेदवारांची घोषणा होईल.
इचलकरंजी महापालिकेसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. ही निवडणूक एकत्रित लढण्याचे महायुतीच्या नेतेमंडळींनी ठरविले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार राहुल आवाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची शुक्रवारी चर्चा झाली. गुरुवारी भाजप आणि राष्ट्रवादीतही चर्चा झाली आहे. महायुती म्हणून एकत्रित लढायचे अन् निवडणूक जिंकण्याचा इरादा पक्का केला आहे.