सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांवर पलटवार, त्यांना उत्तर द्यायची गरज नाही कारण गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलंय
schedule07 Nov 26 person by visibility 7 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: गोकुळ दूध संघाच्या राजकीय स्थितीवरुन भारतीय जनता पक्षाचे खासदार धनजंय महाडिक यांनी केलेल्या टीकेचा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे. आमदार पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्री महोदय ,आपण दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. साडेसहा वाजता आपल्याच पक्षाच्या राज्यसभा खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन विपरीत भूमिका मांडली. त्याला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. कारण गोकुळच्या निवडणुकीत घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २ लाख ७० हजार मतांनी कोल्हापूरकरांनी उत्तर दिले होते. ’असे प्रत्युत्तर दिले.
भाजपाचे खासदार महाडिक यांनी शनिवारी सायंकाळी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना, ‘ आमदार सतेज पाटील हे खोटे बोलण्यात पटाईत आहेत. फेक नरेटिव्हचे बादशहा आहेत. त्यांनी लोकांची दिशाभूल करू नये. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आम्ही आभार मानतो. कारण त्यांनी शासन नियुक्त संचालक निवडीचा निर्णय घेऊन गोकुळ दूध संघ हा डॉ.डी. वाय. पाटील दूध संघ होण्यापासून वाचविला.’असे टीकास्त्र सोडले होते. त्या टीकेचा आमदार पाटील यांनी समाचार घेतला.
तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर केलेल्या टिप्पणीवर बोलताना आमदार पाटील यांनी म्हटले ‘आपण कोरमचा वैधानिक मुद्दा मांडला आहे. पण चेअरमन निवडीसाठी कोरमची आवश्यकता नाही, असे आमचे म्हणणे आहे आणि न्यायालयात देखील आम्ही ते सांगितले आहे. पण निवडीसाठी कोरमचा पोटनियम आहे, असे जर आपले म्हणणे असेल तर १३ जणांचा कोरम होतो व आहे. जर तो नाही असे आपले म्हणणे असेल तर वाढीव संचालकांना मताचा अधिकार देण्याचा कायदा करण्याऐवजी कोरमबाबतचा नियम रद्द करण्याचा कायदा आपण का केला नाही ?
‘गोकुळच्या निवडणुकीत आमच्या समविचारी आघाडीच्या १३ उमेदवारांना निवडून देऊन मतदारांनी बहुमत दिले आहे. आता महायुतीचे जे बारा संचालक निवडून आलेले आहेत, त्यांनी दहा नोव्हेंबरला सभेला उपस्थित राहून गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील यांचा चेअरमन होण्याचा मार्ग सुकर करावा. यामुळे निश्चितपणे लोकशाही टिकेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही वाढेल.तसेच पुढील पाच वर्षांच्या काळात निवडून आलेले सर्व २५ संचालक एकत्रितपणे काम करून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे न्याय देतील.’असे पाटील यांनी म्हटले.