सतेज पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा, वक्तव्ये करताना भान राखा : सत्यजित कदमांचा पलटवार
schedule30 Jul 24 person by visibility 1980
categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “केवळ स्टंटबाजी करण्यासाठी पुराच्या पाण्यात उतरून काहीतरी केल्याचा आव आमदार सतेज पाटील आणत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांची दिशाभूल करण्याचा सतेज पाटील यांचा केविलवाणा प्रयत्न आहे पण मतदार आता शहाणे झाले आहेत. एकही पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सतेज पाटील यांनी काळजी करू नये.पूरग्रस्तांना 'लाडके पूरग्रस्त' म्हणून पाटील यांनी क्रूर चेष्टा केली आहे. राजकीय वक्तव्ये करताना पूरग्रस्तांची चेष्टा होणार नाही याचे त्यांनी भान राखावे”अशी खरमरीत टीका जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्याजित कदम यांनी केली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी आजरा, चंदगड तालुक्यातील दौऱ्यात पूरपरिस्थितीवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला होता. आजरा तालुक्यात केवळ तीस टक्के नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.७० टक्के पंचनामे झाले नाहीत. प्रशासन कोणत्या कामात व्यस्त आहे, हे मला माहित नाही. मात्र ज्या पद्धतीने लाडकी बहिण योजना लोकांपर्यंत पोहोचवली जात आहे. त्याच पद्धतीने लाडक्या पूरग्रस्ताकडे सरकारने लक्ष द्यावे. कागदी घोडे नाचविण्याऐवजी सरकारने पूरग्रस्तांना मदत करावी टोला मारला होता.
आमदार पाटील यांच्या या टीकेला कदम यांनी उत्तर दिले आहे. कदम यांनी म्हटले आहे, पूरग्रस्त संकटात असताना त्यांना लाडके पूरग्रस्त असे वक्तव्य करणाऱ्यांना भान राखावे.कोल्हापूर जिल्ह्याला महापुराने विळखा घातला असला तरी महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती बाधित झाली आहे. तसेच अनेकांच्या घरात महापुराचे पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्य आणि इतर संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.
सरकारी नोंदीनुसार 30,284 हेक्टर शेती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ऊस, भात, ज्वारी,सोयाबीन, भुईमूग, कडधान्ये अशा विविध खरीप पिकांचा समावेश आहे. शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने सध्या नजर अंदाज पंचनामे सुरू आहेत. महापुराचे पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर पीक नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे केले जाणार आहेत. तसेच जिल्ह्यात दोन हजाराहून अधिक सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांची हानी झाली आहे. याही नुकसानीची पाहणी प्राथमिक स्तरावर शासकीय यंत्रणे कडून करण्यात येत आहे. ही वस्तुस्थिती असताना सतेज पाटील यांनी मात्र नेहमीप्रमाणे यातही राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे.
पूरग्रस्तांना 'लाडके पूरग्रस्त' म्हणून सतेज पाटील यांनी त्यांची क्रूर चेष्टा केली आहे. वास्तविक नैसर्गिक आपत्ती आली असताना राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून आपत्तीग्रस्तांना मदत करणे अपेक्षित असते पण सदा सर्वकाळ केवळ राजकारणाचा विचार करणाऱ्या सतेज पाटील यांच्याकडे तेवढी परिपक्व नीतिमत्ता नाही असा टोला माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी लगावला. २०२१ मध्ये आलेल्या प्रलयंकारी महापुरात अनेकांचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी पालकमंत्री असलेल्या सतेज पाटील यांनी काय दिवे लावले हे संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे असेही कदम यांनी म्हटले आहे.