खासगी क्लास संचालकांची सरकारकडे मागणी, नीट पेपरफुटीप्रकरणी दोषीवर कारवाई व्हावी
schedule20 May 26 person by visibility 13 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेली नीट यूजी २०२६ परीक्षा पेपरफुटी आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या गैरव्यवहारांमुळे देशभरातील २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. या पेपरफुटीचा तसेच याममध्ये सामील असणाऱ्या सर्व व्यक्तींचा महाराष्ट्र प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन तीव्र निषेध करत आहे. क्लास संचालक दोषी आढळल्यास त्याच्यावरही कठोर कारवाई करावी. संघटना कोणत्याही दोषी क्लास संचालकांच्या पाठीशी राहणार नाही. असे निवेदनात म्हटले आहे.
प्रोफेशनल टीचर्स असोसिएन, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रशांत कासार, एम. बी. सावंत, तानाजी चव्हाण, अभिनव तेली, बसवंत पाटील, उत्तम मेथे, दीपक खोत, संजय दाभाडे, दिशा पाध्ये, प्राची पाटील, एस. एम. पाटील, शहाजी पाटील यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन दिले. ‘नीट पेपरफुटीच्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. या प्रकरणातील सर्व दोषी आरोपींना अटक करून कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी आम्ही करत आहोत. या प्रकरणातील दोषीना जलद गतीने शिक्षा मिळण्यासाठी स्वतंत्र जलदगती न्यायालयाची स्थापना करण्यात यावी. नीट सारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेत होणाऱ्या पेपरफुटीला आळा घालण्यासाठी परीक्षा पद्धतीचे केंद्रीय स्तरावर आधुनिकीकरण आणि कठोर कायदे करण्याची नितांत गरज आहे. यामध्ये ऑनलाईन परीक्षांचा अवलंब, कडक सुरक्षा यंत्रणा आणि एनटीए या संस्थेच्या कारभारात पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. संपूर्ण परीक्षा एकाच दिवशी न घेता टप्प्याटप्प्याने किंवा विविध सत्रांत (Multiple Shifts) घेण्याचे नियोजन करता येऊ शकते. यामुळे प्रश्नपत्रिका फुटला आळा बसेल. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन प्रमाणे भारतीय राज्यघटनेखाली स्वतंत्र घटनात्मक अशी एजन्सी गठीत करण्यासाठी कायदा करुन, त्याव्दारे नीटची परीक्षा घेण्यात यावी.’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
’