प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसने आता कौशल्य विकास विद्यापीठाकडे वाटचाल करावी - डॉ. सुनीलकुमार लवटे
schedule17 Apr 26 person by visibility 84 categoryशैक्षणिक
प्रा. विनय गजानन पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार सोहळा व गौरवग्रंथ प्रकाशन समारंभ दिमाखात
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘‘राजर्षी शाहू महाराजांनी मराठा समाजाचे विकासाचे स्वप्नं पाहत श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसची स्थापना केली. संस्थेचे माजी चेअरमन डी. बी. पाटील यांनी या संस्थेचा भविष्यलक्षी विकास केला. या संस्थेने आता कात टाकताना कौशल्य विकास विद्यापीठाकडे वाटचाल करावी आणि त्याची जबाबदारी प्रा. विनय पाटील यांच्याकडे सोपवावी. कारण संस्थेचे माजी चेअरमन डी. बी पाटील यांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता म्हणजे विनय पाटील होय. सेवानिवृत्तीनंतर संस्थेने त्यांच्या ज्ञानाचा, क्षमतेचा व कौशल्याचा वापर करुन घ्यावा.जेणेकरुन संस्थेला नवी ऊर्जा मिळेल.’अशी भूमिका साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी मांडली.
महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील किमान कौशल्य व्यवसाय अभ्यासक्रम विभागप्रमुख प्रा. विनय गजानन पाटील हे ३१ मे २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सपत्नीक सत्कार सोहळा शुक्रवारी १७ एप्रिल २०२६ आयोजित केला होता. माजी आमदार मालोजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. मानपत्र, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे सत्काराचे स्वरुप आहे. याप्रसंगी ‘विनय’या गौरवग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले. कळंबा येथील अमृतसिद्धी सांस्कृतिक भवन येथे झाला. मानपत्राचे वाचन प्राचार्य जी. पी. माळी यांनी केले. याप्रसंगी वनिता विनय पाटील यांचा व श्रीमती रत्नप्रभा गजानन पाटील यांचा सत्कार मीरा गायकवाड व माई हिर्डेकर यांच्या हस्ते झाला. प्रा. विनय पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त गौरव समितीतर्फे महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजला ५१ हजार रुपयांची देणगी प्रदान करण्यात आली. मुख्याध्यापक उदय आतकिरे व क्रीडा विभागप्रमुख प्रदीप साळोखे यांनी धनादेश स्वीकारला.
लवटे म्हणाले,‘ सर्वच शिक्षण संस्थेमध्ये समर्पित वृत्तीने, ध्येयवादाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्याच्या काळात व्यवस्था आहे पण शिक्षण नाही. शैक्षणिक संस्थांनी बदलती स्थिती, विद्यार्थ्यांच्या अपेक्षा यासाऱ्याची सांगड घालत शिक्षणाचा नवा रोडमॅप तयार करायला हवा. विनय पाटील यांनी असे ठरवलं पाहिजे की मी माझं उर्वरित आयुष्य संस्थेच्या नव्या नियोजनासाठी घालवीन. मुळात इतरांनीही त्यांना केवळ शेतीपुरतेच गुंतवून ठेव नये. आणि विनय पाटील यांनीही निवृत्तीनंतर कार्य करण्यासाठी शिवाजी बोर्डिंग हाऊसच पर्याय निवडावा आणि या संस्थेच्या विकासासाठी त्याला जे काही करता येईल ते त्यांनी करावं. म्हणजे आजचा शुभेच्छांचा समारंभ हा त्यांच्या पुनर्स्थापनेचा समारंभ ठरेल.’
माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी प्रा. विनय पाटील यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. त्यांची ध्येयवाद, समर्पित वृत्ती भावते. त्यांनी संस्थेतंर्गत विविध जबाबदाऱ्या अतिशय सक्षमपणे पार पाडल्या आहेत. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसला राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारकार्याचा वारसा लाभला आहे. तोच वारसा साऱ्यांनी पुढे न्यायचा आहे. आमदार जयंत आसगावकर व हुतात्मा उद्योग समूहाचे वैभव नायकवडी यांनी प्रा. विनय पाटील यांच्या व्यक्तीमत्वातील विविध पैलू उलगडले. शाळा व कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
डी.बी.पाटील, गजानन पाटील यांच्या आठवणीने विनय पाटील भावूक
सत्काराला उत्तर देताना प्रा. विनय पाटील यांनी आतापर्यंतच्या वाटचालीत अनेकांचे सहकार्य लाभले. प्रत्येकाकडून वेगवेगळया गोष्टी शिकत गेलो.’असे कृतज्ञतापूर्वक नमूद केले. ‘संस्थेचे माजी चेअरमन व काका डी. बी. पाटील व वडील गजानन पाटील यांचार माझ्यावर खूप प्रभाव राहिला’असे सांगताना प्रा. पाटील यांच्या डोळयांच्या कडा ओलावल्या. यानंतर भाषणात त्यांनी शिक्षकांची कर्तव्ये, पालकांची भूमिका, नवीन शैक्षणिक धोरणाचे महत्व अधोरेखित केले. नव्या शैक्षणिक धोरणाला सामोरे जाताना शिक्षक सक्षम पाहिजे. विद्यार्थी सक्षम पाहिजे. पालक सक्षम पाहिजे. समाज व संस्था सक्षम पाहिजेत. आणि सरकार सुद्धा सक्षम पाहिजे.’ असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय पुणे सेवानिवृत्त सहसंचालक चंद्रकांत निनाळे, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष बी. जी. बोराडे यांनी मनोगत व्यक्त केले. गौरव समितीचे अध्यक्ष डॉ.बी. एम. हिर्डेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. ए. ए. कलगोंड यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. शाहीर आझाद नायकवडी यांनी पोवाडा सादर केला. प्रा. सर्जेराव शेटके, प्रा. मनिषा नायकवडी यांनी सूत्रसंचालन केले. गौरव समितीचे सचिव युवराज कदम यांनी आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील, सतीश गजानन पाटील, गौरव समितीचे कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गायकवाड, प्राचार्य प्रवीण चौगले, प्रा. श्रीराम परांजपे, प्रा. विनोद उत्तेकर, प्रा. एस. आर. पाटील, प्रा. जयसिंगराव सावंत, प्रा. अर्चना जगतकर, प्रा. संजय थोरात, राजेंद्र पाटीलव्यासपीठावर उपस्थित होते.