महाप्रसादातून विषबाधा, ७०० हून अधिक जणांना त्रास ! शिवनाकवाडीतील घटना !!
schedule05 Feb 25 person by visibility 337 categoryआरोग्यलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे महाप्रसादातून ७०० हून अधिक लोकांना विषबाधा झाली. १८७ नागरिकांवर प्राथमिक उपचार केले आहेत. तर गंभीर रुग्णांना इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालय व अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत, आरोग्य विभागाने महाप्रसादातील पदार्थ व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने विषबाधा कशामुळे याचा तपास करत आहेत. शिवाय आरोग्य विभागामार्फत घरोघरी भेट देऊन माहिती घेतली जात आहे.
शिवनाकवाडीचे ग्रामदैवत कल्याणीदेवीची यात्रा सुरू आहे. यात्रेनिमित्त मंगळवारी (४ फेब्रुवारी) महाप्रसादाचे आयोजन केले होते. दरम्यान रात्रीनंतर अनेक नागरिकांना उलटी, जुलाबाचा त्रास सुरू झाला. पहिल्यांदा खासगी डॉक्टरांच्याकडे काहींनी उपचार घेतले. दरम्यान रुग्णसंख्येत वाढ होत गेली. यामुळे आरोग्य केंद्राकडे नागरिकांची गर्दी वाढली. यामुळे हा विषबाधाचा प्रकार असल्याचे लक्षात आले. आरोग्य यंत्रणा सक्रिय होऊन उपचारास सुरुवात केली.
आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवनाकवाडी येथे धाव घेतली. परिस्थितीची पाहणी केली. सद्यस्थितीचा आढावा घेऊन तातडीने प्रशासनातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेची माहिती घेतली.आरोग्य विभागाला वैद्यकीय उपचारासंबधी सूचना केल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडूरंग खटावकर हे घटनास्थळी आहेत. माजी आमदार उल्हास पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, तहसिलदार अनिल हेळकर, गटविकास अधिकारी नारायण घोलप, कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय भोजे, पृथ्वीराज यादव यांनी रुणांची विचारपूस केली. नातेवाईकांना धीर दिला. प्रशासनाने रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.