मनोज सुतार यांच्या चित्रांचे डिसेंबरमध्ये मुंबईत प्रदर्शन
schedule27 Nov 24 person by visibility 53 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : चित्रकार मनोज सुतार यांच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई या ठिकाणी ९ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रदर्शन होणार आहे. या कलाकृतींमधून केवळ दृश्यानंद नव्हे, तर अंतर्मनाशी संवाद साधण्याची अनुभूती मिळेल. यामध्ये आपण आपल्या अंतर्मनाला सामोरे जाण्याची आणि जगाला एका नवीन दृष्टीने पाहण्याची संधी मिळवू असा भावना चित्रकार सुतार यांनी व्यक्त केल्या आहेत.
सुतार हे इचलकरंजी येथील आहेत. त्यांचे आतापर्यंत विविध ठिकाणी चित्र महोत्सव झाले आहेत. कोल्हापूर कला महोत्सव, ठाणे कला महोत्सव, बेळगाव कला महोत्सव, नेहरु सेंटरमध्ये प्रदर्शने झाली आहेत. शिवाय चित्रांची प्रात्यक्षिकांच आयोजनही विविध शहरात केले आहे. जीडी आर्ट आणि आर्टमध्ये मास्टर पदवी घेतलेल्या सुतार यांची विविध माध्यमात चित्र रेखाटण्याची खासियत आहे.
चित्रकृतीमागील भावना मांडताना सुतार म्हणाले, “ कला ही मनाच्या गाभ्याचा आरसा असते, जी मानवी भावना, विचार, आणि अनुभव यांचे प्रतिबिंब दाखवते. "रिफ्लेक्शन" या संकल्पनेवर आधारित हे चित्रकला प्रदर्शन आपल्याला स्वतःकडे, समाजाकडे आणि निसर्गाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देते. प्रत्येक कलाकृतीतून व्यक्त झालेल्या प्रतिबिंबांचा अर्थ शोधणे म्हणजे आपल्याच मनाचा शोध घेणे. या प्रदर्शनातील चित्रांमध्ये पाण्यावरील प्रतिबिंबांपासून अंतर्मनातील विचारांपर्यंत, वेगवेगळ्या स्वरूपांतील प्रतिबिंब मांडले आहेत.”