महावितरणची ग्राहकांसाठी गो ग्रीन सेवा, तर वीजबिलात एकरकमी १२० रुपये सवलत
schedule31 Dec 24 person by visibility 204 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महावितरण कंपनीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला वीज ग्राहकांसाठी निर्णय घेतला आहे. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे. महावितरणकडून 'कागद वाचवा, पर्यावरण वाचवा' या संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीज बिलात दहा रुपये सूट देण्यात येते. मात्र आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील बारा महिन्यासाठी तत्काळ १२० रूपये एकरकमी सवलत मिळणार आहे.
गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ् या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई - मेल द्वारे वीज बिल पाठविण्यात येते. शिवाय गो ग्रीन ग्राहकांना मासिक वीज बिलात दहा रुपये सूट देण्यात येते. महावितरणच्या तीन कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत चार लाख ६२ हजार म्हणजेच १.१५ टक्के ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडला आहे. भविष्यात हे प्रमाण वाढावे, या हेतूने महावितरणने गो ग्रीन पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात तत्काळपणे १२० रुपये एकरकमी सुट देण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठविण्यात येणार आहे. गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एकरकमी सवलत येणार आहे. त्यानंतर पुढील वर्षभर व सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ई-मेलवर वीज बिल पाठविण्यात येणार असून त्यापुढे दरमहा वीज बिलात दहा रुपये सूट देण्यात येणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणने आवाहन केले आहे. गो ग्रीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्या व गो ग्रीन चा पर्याय निवडा.