आमदार शिवाजीराव पाटील हा घरातील मुलगा, त्यांना रागावण्याचा अधिकार - मंत्री चंद्रकांत पाटील
schedule13 Jun 26 person by visibility 115 categoryराजकीय
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी अजून पक्की मतदार यादी तयार व्हायची आहे. मतदार यादी तयार झाली, कोणाचे किती ठराव यावरच जागेचा क्लेम करता येईल.’असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील हा घरातील मुलगा आहे. मुलांना, आई वडिलांवर रागावण्याचा अधिकार असतो. मात्र, त्यांनी गोकुळच्या बैठकीवरुन उपस्थित केलेले मुद्दे म्हणजे चहाच्या पेल्यातील वादळ आहे. मुळात रेसिडेन्सी क्लब येथील महायुतीच्या नेत्यांची बैठक पूर्वनियोजित नव्हती. आमदार पाटील यांची समजूत काढली आहे. त्यानंतर त्यांनी माझ्या कौतुकाचे जे मेसेज पाठविले आहेत, ते वाचून मी सदगदि्त झालो असे मंत्री पाटील म्हणाले.
गोकुळच्या निवडणुकीसंबंधी नुकतीच मंत्री पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम यांची बैठक झाली. या बैठकीविषयी न कळविल्याबद्दल आमदार शिवाजीराव पाटील व आमदार चंद्रदीप नरके यांनी नाराजी व्यक्त केली होती. यासंबंधी पत्रकारांनी मंत्री पाटील यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘आमदार पाटील व आमदार नरके या दोघांशी बोलणे झाले आहे. त्यांचे गैरसमज दूर झाले आहेत. ’
महामंडळावरील नियुक्त्या कधी होणार या प्रश्नावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, ‘लागोपाठ निवडणुका झाल्यामुळे बराचसा कालावधी आचारसंहितेत गेला. यामुळे महामंडळावरील नियुक्त्या रखडल्या. महायुतीतंर्गत तीनही पक्षाकडे महामंडळावरील संख्याबळाबाबत एकमत झाले आहे. आता कोणते महामंडळ कोणाकडे हे ठरायचे आहे. लवकरच महामंडळावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाचाही निर्णय लवकरच होईल.’ पत्रकार परिषदेला विक्रम पावसकर, भाजप प्रदेश चिटणीस महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.
……………….
नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर देशाची प्रतिमा उंचावली
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा उंचावली आहे. देशवासियांसाठी त्यांनी विविध योजना राबविल्या. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण केला. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची आर्थिक प्रगती वेगावली. शेतकरी, महिला वर्गाच्या हिताच्या योजना आणल्या. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या तपपूर्तीत नवा भारत घडला. ’असे मंत्री पाटील म्हणाले.