सहकारी संस्थेत संचालक वाढीचा लेटरबाँम्ब, चद्रकांत पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र! तर गोकुळमधील संचालक संख्या ३३ !!
schedule01 Nov 26 person by visibility 169 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: तीन हजारहून अधिक कोटीची उलाढाल असलेल्या सहकारी संस्थेत शासन नियुक्त व तज्ज्ञ संचालकांची सदस्य संख्या दोनवरुन चार करावी. त्यासाठी अधिनियमता सुधारण्यासंबंधीचे पत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. यासंबंधीचे पत्र सोशल मिडियावर रविवारी (एक नोव्हेंबर २०२६) व्हायरल झाले आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोळा ऑक्टोबर २०२६ रोजी हे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविले आहे. कोल्हापूर जिल्हयामध्ये गोकुळ आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेची उलाढाल तीन हजार कोटीहून अधिक आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक १८ ऑक्टोबर रोजी झाली. गोकुळमधील संचालकांची संख्या २५ आहे. सरकारने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमामध्ये शासन नियुक्त व संस्था नियुक्त संचालक वाढीसंबंधी आवश्यक सुधारणा करण्याचा निर्णय घेतला तर गोकुळमधील एकूण संचालक ३३ होऊ शकते.
राज्यातील मोठया आकाराच्या सहकारी संस्थांचे कामकाज आणि प्रशासकीय नियंत्रण अधिक मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमामध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात असे पत्रात म्हटले आहे. सध्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावर दोन शासकीय सदस्य नियुक्त केले जातात.
मध्यम व लहान आकाराच्या संस्थांसाठी ही व्यवस्था योग्य असली तरी ज्या सहकारी संस्थांची वार्षिक उलाढाल तीन हजार कोटीहून जास्त आहे. त्यांच्याकडे अवाढव्य प्रमाणावर सार्वजनिक निधी आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या असतात. अशा अवाढव्य आर्थिक उलाढाल व सार्वजनिक हित गुंतलेल्या मोठया संस्थामध्ये अधिक पारदर्शक, व्यावसायिक कौशल्य आणि प्रभावी प्रशासकीय नियंत्रण असणे आवश्यक आहे. यासाठी सरकारकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या संचालकांची संख्या दोनवरुन चार करावी. आणि संस्थेकडून निश्चित केलेल्या संचालकांची संख्या दोन वरुन चार करावी असे पत्रात म्हटले आहे. यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत येण्यासाठी सूचना व्हाव्यात असे पत्रात म्हटले आहे.