माझ्या कामाची पद्धत नेत्यांना माहीत, सकरात्मक निर्णय होईल –सत्यजीत कदम
schedule26 Oct 24 person by visibility 110 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘जवळपास वीस वर्षे मी समाजकारणात आहे. नगरसेवक म्हणून शहराच्या विकासाचा दृष्टीकोन ठेवून कामकाज केले. समाजकारण-राजकारण करताना सामान्यांना केंद्रस्थानी ठेवून काम केले. त्या कामाच्या बळावरच कोल्हापूर उत्तरची उमेदवारी मी मागितली आहे. माझ्या कामाची पद्धत महायुतीच्या नेत्यांना माहित आहे. सकारात्मक निर्णय होईल अशी आशा आहे. कोल्हापूरच्या प्रगतीचा आलेख आणखी उंचावण्यासाठी तुमची साथ कायम राहू दे..’ अशी साद जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजीत कदम यांनी कार्यकर्ते व नागरिकांना घातली.
तसेच केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची सत्ता असेल तर शहर विकासाला चालना मिळते. यासाठी महायुतीचा प्रचार करायचा आहे. भाजप हा जगात एक नंबरचा पक्ष आहे. पुन्हा एकदा महायुतीला सत्तेवर आणायचे आहे.’ असे आवाहनही त्यांनी केले.
निमित्त होते, कोल्हापूर उत्तर निवडणुकीच्या अनुषंगाने नानाप्रेमी कार्यकर्ते व नागरिकांतर्फे निर्धार मेळाव्याचे. या मेळाव्यात सत्यजीत कदम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद हॉल येथे हा मेळावा झाला. या मेळाव्याला माजी महापौर दीपक जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती आशिष ढवळे, माजी नगरसेवक सतिश घोरपडे, दत्तात्रय इंगवले, माजी नगरसेविका सीमा कदम, कविता माने, किसान संघाचे भगवान काटे, सुनील मोहिते, वैभव माने, अविनाश कुंभार आदी उपस्थित होते.
‘महायुती अंतर्गत कोल्हापूर उत्तरमधील उमेदवारीच्या दाव्यावरुन विनाकारण गैरसमज पसरविण्यात आले. कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीचा निर्णय अजून व्हायचा आहे. मी आशावादी आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत २००४ पासून मी सावलीसारखा आहे. धनंजय महाडिक आणि मी एकच आहोत. ही निवडणूक वैयक्तिक दोषारोपाची नाही, गटातटाची भाऊबंदकीची आणि बांधावरील नाही. कोल्हापूरच्या विकासासाठी आमची लढाई आहे.’असेही त्यांनी स्पष्ट केले. एक नगरसेवक, जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून शहर विकासासाठी ८० कोटीहून अधिक निधी आणू शकतो. यापेक्षा आणखी मोठे पद मिळाले तर शहर विकासाला आणखी वेग येईल या भूमिकेतून मी उमेदवारी मागितली आहे.’असेही त्यांनी सांगितले.
वडील व माजी महापौर शिवाजीराव कदम यांच्याकडून मिळालेले समाजकारणाचे बाळकडू, जबाबदार नगरसेवक म्हणून पार पाडलेली भूमिका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार महाडिक यांच्या नेतृत्वाखाली केलेले काम, २०२२ मधील पोटनिवडणूक, त्यामध्ये ८० हजाराहून अधिक प्राप्त मते, आताच्या निवडणुकीसाठी केलेली तयारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट या साऱ्या गोष्टी त्यांनी उपस्थितासोबत शेअर केल्या.
............................
वर्षभरात ८० किलोमीटरचा प्रवास....
सत्यजीत कदम म्हणाले, ‘कोल्हापूरचे व्हिजन डोळयासमोर ठेवून काम करत आहे. गेल्या वर्षभरात शहर विकासाच्या कामासाठी, नागरिकांच्या कामांची सोडवणुकीसाठी कोल्हापूर ते मुंबईचा प्रवास हा असंख्य वेळा केला. तब्बल ८० हजार किलोमीटरचा प्रवास मोटारीने केला आहे. माझ्या कामाची पद्धत महायुतीतील सगळया नेत्यांना माहित आहे. रविवारी दुपारपर्यत महायुतीच्या उमेदवाराची घोषणा होईल. . ते निश्चितच चांगला निर्णय घेतील. साऱ्यांनी महायुतीचा प्रचार करायचा आहे.’
.............................
सत्यजीत कदम यांचे बंधू शशी कदम यांनी मनोगतामध्ये सांगितले की, सत्यजित कदम हे मुंबईला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलावून घेतले आहे. गेल्या निवडणुकीत पराभव झाला तर खचून न जाता त्यांनी काम केले आहे. आताच्या घडीला वातावरण गढूळ होईल अशी वक्तव्ये कोणी करु नयेत. पक्ष महत्वाचा आहे. महायुतीचे आपण घटक आहोत. आपल्यातील एकी कायम ठेवा. पक्षाकडून निश्चितच आनंदी बातमी मिळेल.’याप्रसंगी बोलताना कल्पना सावंत, शकील जमादार यांनी सत्यजित कदम यांना विधानसभेवर पाठविण्यासाठी साऱ्यांनी प्रयत्न करावेत अशी मते मांडली.