कोल्हापूरच्या धावपटूंचे उत्साही स्वागत, जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार
schedule11 Jun 25 person by visibility 110 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: कोल्हापूरच्या धावपटूंनी दक्षिण आफ्रिकेतील जगप्रसिद्ध आणि सर्वाधिक खडतर समजल्या जाणाऱ्या ९० किलोमीटर लांबीच्या ‘कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन’ शर्यतीत यशस्वीरित्या सहभाग घेतला. या स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार केला.
यापैकी उपस्थित असलेल्या चेतन चव्हाण, दिलीप जाधव, डॉ. विजय कुलकर्णी, गोरख माळी, सुषमा रेपे आणि डॉ. पराग वाटवे यांना पुष्पगुच्छ, शाल आणि पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यांच्यासह अमोल यादव, सचिन बुरसे, स्वरूप पुजारी, विजय पाटील, अम्रपाल कोहली आणि डॉ. केतकी साखरपे यांनीही या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी उपस्थित होते.
उपस्थित स्पर्धकांनी स्पर्धेतील अनुभव सर्वांसमोर मांडले. ही शर्यत पीटरमैरिट्सबर्ग ते डर्बन या मार्गावर पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूरच्या चमूमध्ये दोन महिला धावपटूसह एकूण १२ धावपटूंनी सहभाग घेतला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने सराव, नियोजन आणि मानसिक तयारी यांचा समन्वय साधत हे यश मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले. कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन केवळ लांब अंतराची शर्यत नसून, ती शरीर, मन आणि इच्छाशक्तीची कसोटी आहे. यंदाच्या मार्गात जवळपास १,२०० मीटर उंची होती, तसेच सात मोठे डोंगर आणि अनेक छोट्या टेकड्या पार कराव्या लागल्या, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान कोल्हापुरातील विविध संस्था संघटनेच्यावतीने छत्रपती ताराराणी चौक येथे धावपटूंचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता बी. एल. हजारे, एस. आर पाटील, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनीअरिंगचे अध्यक्ष अजय कोराणे, अॅड. राजेंद्र किंकर आदी उपस्थित होते.