शिक्षक बदली पोर्टलमधील अअनियमितता दूर करा, अन्यथा कोर्टात दाद मागणार : पुरोगामी शिक्षक संघटना
schedule29 Jul 25 person by visibility 39 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शैक्षणिक सत्र सुरु असताना राज्यात सुरु असलेल्या शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेत बदली पदस्थापना देताना पोर्टलला मंजूर पदांचा विचार न झाल्याने काही शाळेत मंजूर पदापेक्षा जादा शिक्षकांना पदस्थापना दिली गेली आहे. पदच उपलब्ध नसताना पदस्थापना देणे ही बाब अनियमितता आहे. ही अनियमितता दूर करावी अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने केली आह. ही अनियमितता दूर झाली नाही तर कोर्टात दाद मागू असा इशारा पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिला आहे.
जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेत संवर्ग एक व संवर्ग दोनची बदली प्रक्रिया पूर्ण होवून प्रसिद्ध झालेल्या बदली याद्यामध्ये वरील बाब निदर्शनास आली आहे. संघटनेने म्हटले आहे, संबंधित शाळेत मंजूर पदापेक्षा जादा पदस्थापना दिल्याने भविष्यात सदर शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे व विनाकारण शिक्षकांना आतरिक्त व्हावे लागणार आहे हा त्या शिक्षकांवर अन्याय होणार आहे. भविष्यात काही अडचण निर्माण होवू नयेत यासाठी सध्या अतिरिक्त असलेल्या पदावर जिल्हातंर्गत बदली प्रक्रियेत मंजूर पदापेक्षा जादा देण्यात आलेल्या पदस्थापना बदलून देण्यात याव्यात व पुढील टप्प्यात मंजूर पदापेक्षा जादा पदस्थापना होणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. संघटनेचे राज्य नेते विजय भोगेकर, राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरीश सासनकर, महिला राज्यध्यक्षा अलका ठाकरे, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर, शंकर पवार, एस के पाटील, तुषार पाटील, विद्या कदम, अलका थोरात, पी आर पाटील, प्रमिला माने आदींच्या सह्या आहेत.