कोल्हापूर अर्बनच्या निवडणुकीत कणेरकर, निगडे पॅनेल आमनेसामने !
schedule07 Oct 22 person by visibility 820 categoryउद्योग

अर्ज छाननी प्रक्रियेनंतरच पॅनेलची घोषणा, दोन्ही बाजूकडून उमेदवारांची चाचपणी
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील एक नावाजलेली व नामांकित बँक म्हणजे, दि कोल्हापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक. या बँकेला तब्बल शतकोत्तर परंपरा लाभलेली आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून आणि भास्करराव जाधव यांच्या प्रेरणेतून बँकेची उभारणी झाली. या बँकेची तब्बल २८ हजार इतकी सभासद संख्या आहे. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुढील महिन्यात अर्थात तेरा नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत बँकेचे माजी अध्यक्ष शिरीष कणेरकर यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ पॅनेल तर बँकेचे माजी अध्यक्ष उमेश निगडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये थेट लढतीची चिन्हे आहेत. दोन्ही बाजूंनी निवडणुकीची तयारी सुरू आहे. उमेदवारांच्या निश्चितीपासून प्रचार आणि सभासद संपर्कापर्यंत रणनिती आखली आहे.
दि कोल्हापूर अर्बन बँक ही शहरवासियांच्या जिव्हाळयाची. या बँकेवर वर्चस्व हा प्रतिष्ठेचा विषय आहे. आतापर्यंत बँकेचा नावलौकिक चांगला राहिला आहे. सहकारातील जाणत्या मंडळींनी बँकेचे नेतृत्व केले आहे. पंचवार्षिक निवडणुकीवरुन बँक सध्या चर्चेत आहे. बँकेच्या सर्वसाधारण सभेतही त्याचे प्रतिबिंब पाहावयास मिळत आहे.
बँकेच्या निवडणुकीत यंदा बँकेचे माजी अध्यक्ष शिरीष कणेरकर यांचे जुने पॅनल तर माजी अध्यक्ष उमेश निगडे यांचे नवे पॅनेलमध्ये थेट लढतीची चिन्हे आहेत. सत्तारुढ पॅनेलमध्ये बहुतांश विद्यमान संचालकांचा समावेश राहील असे चित्र आहे. बँकेची माजी अध्यक्ष स्वर्गीय अॅड शामराव शिंदे यांचे पुतणे अॅड प्रशांत शिंदे हे जुन्या पॅनल मधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. बँकेचे माजी अध्यक्ष कणेरकर व अन्य संचालक मंडळी पॅनेल बांधणीची आखणी करत आहेत.
दुसरीकडे बँकेचे माजी अध्यक्ष उमेश निगडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल निवडणूक लढविणार आहे. राजर्षी शाहू भास्करराव जाधव संस्थापक पॅनेल या नावांनी निगडे यांनी पॅनेलची घोषणा केली आहे. निगडे यांच्यासोबत चार विद्यमान संचालक असल्याचा दावा आहे.
बँकेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार तेरा ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी आहे. चौदा ऑक्टोबरला पात्र उमेदवारांची यादी घोषित होईल. अर्ज छाननीनंतरच दोन्ही पॅनेलकडून उमेदवार व पॅनेलची घोषणा होणार आहे.