संशोधनाचे पेटंट घेऊन व्यावसायीकरण करणे महत्त्वाचे : डॉ. डी. टी. शिर्के
schedule22 Nov 25 person by visibility 11 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी संशोधनाचा वापर फक्त शिक्षणापुरता मर्यादित न ठेवता त्याचे पेटंट घेऊन पुढे व्यावसायीकरण करण्यावर लक्ष केंद्रित केल्यास आपण नोकरी शोधणारे न राहता नोकरी देणारे म्हणू शकतो असा विश्वास वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केला. निमित्त होते कोरे अभियांत्रिकीमध्ये 'इंटरनेट ऑफ थिंग्स' या विषयावर आयोजित तीन दिवसीय कृतिशील कार्यशाळेच्या समारोपाचे. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांनी पुस्तके ज्ञानाबरोबर अशा उपक्रमातून कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
डॉल्फिन लॅबचे चित्तरंजन महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या १००+ अधिक विद्यार्थी, आणि प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. अधिष्ठाता, डॉ. एस्. एम्. पिसे यांनी 'इंजिनिअरिंग म्हणजे कौशल्य विकास' असे समीकरण बनल्याचे सांगत अभियांत्रिकेच्या प्रथम वर्षापासून अंतिम वर्षापर्यंत प्रोजेक्ट बेस लर्निंग, मिनी-मेगा प्रोजेक्ट अशा वेगवेगळ्या कृतिशील उपक्रमांवर भर देत असल्याचे नमूद केले. विभाग प्रमुख डॉ. एस. टी. जाधव यानी स्वागत केले. डॉ. आर. बी. पाटील, डॉ. पी. व्ही. मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. एस. व्ही. लिंगराजू, प्रा. एच. एम. केल्लूर, प्रा. पी. डी. लोले आदींनी विशेष योगदान दिले. डॉ. लिंगराजू यांनी आभार मानले.