आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर संध्याकाळचे मित्र कमी करा, सकाळी भेटणारे मित्र जास्त जोडा- अभिनेता सयाजी शिंदे
schedule30 Jul 24 person by visibility 1274 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘आयुष्यात मोठं व्हायचं आहे, तर पहिल्यांदा संध्याकाळ भेटणारे मित्र कमी करा आणि सकाळच्या वेळी भेटणारे, जीवनविषयक सतत सकारात्मक दृष्टीकोन बाळगणारे, नव विचाराच्या आणि प्रयत्नशील मित्र जास्त जोडा’ हे आवाहन आहे, सिने अभिनेते सयाजि शिंदे यांचे.
निमित्त होतं, कोल्हापुरातील विवेवकानंद कॉलेजतर्फे आयोजित समारंभाचे. विवेकानंद कॉलेजमध्ये एमबीए आणि एमसीए या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा उद्घाटन समारंभ मंगळवारी (३० जुलै) झाला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या समारंभात अभिनेता सयाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळया गप्पा मारल्या. या प्रसंगी त्यांनी सिनेमा-नाट्य क्षेत्रातील अभिनय प्रवास, पर्यावरण संवर्धन यासंबंधी दिलखुलास संवाद साधला. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान असल्याचे प्रारंभीच नमूद करत अभिनेता सयाजी यांनी ‘आजकाल विकासाच्या नावाखाली हजारो झाडे कापली जात आहेत, एकही जंगल सुरक्षित राहिलेले नाही. पर्यावरणाच्या ऱ्हासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लाखो विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची चळवळ हाती घ्यावी. महाविद्यालयातील ग्रंथ आणि शिक्षक यांच्यामुळे अभिनयाची ओढ मला लागली. संस्थेचे आराध्यदैवत स्वामी विवेकानंद हे एक व्यक्ती नसून एक विचार आहेत. स्वामी विवेकानंदांचे विचार आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची शिकवण विद्यार्थ्यांनी अवलंबावी. लहानपणीच विद्यार्थ्यांच्या मनात आई आणि झाडा विषयी प्रेमाची रुजूवात केली पाहिजे. तरच पुढची पिढी चांगली बहरेल. ”
संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणूकीस आळा, श्रम आणि स्वावलंबन या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये रुजाव्यात, यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि रोजगारभिमुख बनविण्यासाठी एमबीए आणि एमसीए अशा अभ्यासक्रमांची आवश्यकता असून या अभ्यासक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी आजच्या काळात रोजगाराच्या संधी कमी होत असताना रोजगार देणारे उद्योजक निर्माण करण्यासाठी एमबीए, एमसीए हे अभ्यासक्रम सुरु करीत असल्याचे सांगितले. यावेळी सिनेकलावंत सुजित शेख यांनी आपले मनोगत मांडले.
संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी ऋषी डोंगरे आणि प्रा. सतीश उपळावीकर यांनी रेखाटलेली रेखाचित्रे अभिनेता शिंदे याना भेट म्हणून दिली. यावेळी सदर अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी कष्ट घेतलेल्या प्राचार्य विरेन भिर्डी, आर. के. पाटील, विराज जाधव, अमित आव्हाड, विजय पुजारी, अश्विनी चौगुले, सर्जेराव खोत यांचा सत्कार करण्यात आला.
कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. एम. बी. ए. चे विभागप्रमुख प्रा. विराज जाधव यांनी आभार मानले. प्रा. सुप्रिया पाटील, प्रा. समीक्षा फराकटे, प्रा. अशोक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास कोल्हापूर विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, प्रभारी प्राचार्य डॉ. महेश गायकवाड आदी उपस्थित होते.
..................
साधे राहा, आनंदी राहा
झाड आणि निसर्गाशी जोडलेल्या नात्याविषयी सयाजी म्हणाले, ‘झाड, फुल, फळ, पान यामध्ये मला माझी आई दिसते. झाड कधीही भेदभाव करत नाही. झाडासारखा जगायला शिका. दुसऱ्यांना आनंद देणं, सावली देणं, फळ देणं. यशस्वी जीवन आणि मोठेपणा म्हणजे काय तर मुक्तपणे श्वास घेत जगता येणं. आयुष्यात इतरांच्यापेक्षा मोठं होणं म्हणजे जीवन यशस्वी नव्हे. तर दुसऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविणं, दुसऱ्यांना दु:ख न देणं म्हणजे जीवन यशस्वी. साधे राहा, आनंदी राहा, ”अशा शब्दांत अभिनेता शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टीकोन रुजविला.