आजीबाईंची शाळा…!
schedule16 Dec 25 person by visibility 15 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सामाजिक परिस्थिती, आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे अनेक महिलांना शिक्षण घेता येत नाही. मनात शिकण्याची ईच्छा असूनही शाळेची पायरी कोसो दूर लांब राहिलेली असते. लग्न, संसार, मुलांचे शिक्षण आणि नातंवडांना खेळविताना हाती काठी कधी आले हे सुद्धा कळत नाही. तिथं साक्षर होण्याचा विचार तर खूप लांबचा. शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अशा आजीबाईसाठी कोल्हापुरात शाळा सुरू आहे. ‘आजीबाईंची शाळा…! ’ या नावांनी सुरू असलेल्या या शैक्षणिक उपक्रमात वयोवृद्ध महिलांना मूलभूत साक्षरता, डिजीटल साक्षरता व आर्थिक साक्षरतेचे धडे दिले जातात.
ही अभिनव शाळा सुरू झालीय, बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन (बीएड) पेठवडगाव व शिवाजी विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने. शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते बीएड कॉलेजमध्ये ‘आजीबाईंची शाळा’ या शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन झाले. संस्थेचे अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयसिंह माने यांच्या अध्यक्षतेखाली या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ झाला.
‘दोन पिढ्यांमधील संवाद वाढवून आनंदी जीवनाचा संदेश देत त्याची कृतिशील अंमलबजावणी करणारा आजीबाईंची शाळा हा उपक्रम समाजाला नवी दिशा देणारा आहे. या उपक्रमातून संस्कृतीचे संवर्धन होण्यास मदत होऊन पारंपरिक ज्ञान माहिती यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. एकोप्याची भावना वृद्धिंगत होण्यास उपक्रम सार्थ ठरेल.’ अशा शब्दांत प्रकुलगुरू जाधव यांनी या उपक्रमाचे महत्व स्पष्ट केली. संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने म्हणाले," नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात बी.एड.कॉलेज अग्रभागी आहे. संवाद हा माहिती मिळविण्याचा प्रमुख मार्ग आहे. आजीबाईंकडून मौलिक मार्गदर्शन मिळून जीवनातील कौशल्ये विकसित होण्यास मदत होते. मूलभूत, डिजिटल व आर्थिक साक्षरता वाढून महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रयत्न गतिमान होण्यास हा उपक्रम उपयोगी आहे."
कॉलेजच्या प्राचार्या डॉ.श्वेता निर्मळे चौगुले म्हणाल्या, या उपक्रमाची संकल्पना राबविणारे एकमेव महाविद्यालय असून महिनाभर उपक्रम राबवून याची पुस्तिका तयार केली जाणार आहे.जागतिक पातळीवर या उपक्रमाची दखल घेतली जाईल. बीएड अभ्यासक्रम शिकणारे १०० विद्यार्थी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील पाच आजीबाईना साक्षर, आर्थिक साक्षर व डिजीटल साक्षर करण्याची जबाबदारी सोपविली आहे. जवळपास एक महिना हा उपक्रम चालणार आहे.’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.रामचंद्र पवार, डॉ. राहुल माने, माधुरी जाधव, शर्वरी करपे यांची भाषणे झाली. प्रा. एस. के. सोरटे, प्रा. ए. पी. सावंत, प्रा. व्ही. डी. चव्हाण, प्रा. टी. पी. दराडे, प्रा. आर. आर. चव्हाण, एस. ए. चौगुले, प्रगती चौगुले, अभिजित सावंत उपस्थित होते.