Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात भरगच्च कार्यक्रमशाहूवाडी तालुक्यात एमआयडीसाठी हालचाली ! पंधरा दिवसात प्रस्ताव सादर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना !!टोप-संभापूर औद्योगिक वसाहतीत उद्योजकांनी उद्योग उभारणीला प्राधान्य द्या-माजी आमदार जयश्री जाधव प्रभाकरपंत कोरगांवकर हे समाज परिवर्तनाचे माध्यम होते-प्राचार्य ईस्माइल पठाण कसबा बावडा - लाईन बझार परिसरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई कराडेप्युटी सीईओ ओमप्रकाश यादवांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीरकेडीसीसीच्या संचालकांची लंडन हाऊसला भेट ! हा आयुष्यातील आनंदाचा दिवस -हसन मुश्रीफपी.एस. घाटगे यांचा खासगी शिक्षक महासंघात प्रवेश ! राज्य प्रवक्तापदी निवड !!प्रख्यात अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांचे निधनक्रिडाई कोल्हापूरतर्फे अभियंता दिनी रक्तदान शिबिर

जाहिरात

 

सुवर्णमहोत्सव, छत्रपती शिवरायांच्या पुतळयाचा !  इतिहास उलगडतोय आशिया खंडातील देखण्या शिल्पाकृतीचा !!

schedule29 Nov 24 person by visibility 1040 categoryशैक्षणिक

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : शिवाजी विद्यापीठ दक्षिण महाराष्ट्रातील विद्येचं पीठ. उच्च शिक्षणाच्या संधी ग्रामीण भागातील उपलब्ध करुन देण्याच्या उदात्त हेतूने या विद्यापीठाची स्थापना झालेली. हिरकमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाने या कालावधीत ‘लोकल टू ग्लोबल’अशी झेप घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावांनी स्थापन झालेले हे एकमेव विद्यापीठ. आणि विद्यापीठाच्या प्रांगणातील शिवरायांचा पुतळाही अलौकिक. छत्रपतींच्या या पुतळयास एक डिसेंबर २०२४ रोजी पन्नास वर्षे होत आहेत. विद्यापीठ प्रशासनाने पुतळा प्रतिष्ठापना सुवर्णमहोत्सव आयोजित केला आहे. हा अश्वारुढ पुतळा म्हणजे अंत्यत देखणी शिल्पाकृती अशी ख्याती सर्वदूर पसरली आहे.

गेल्या पन्नास वर्षात दिमाखात उभा असलेल्या या पुतळयाची निर्मिती पुणे येथील शिल्पकार बी.आर. खेडकर यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रतिष्ठापना सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला ३० नोव्हेंबर २०२४ रोजी विद्यापीठात विशेष कार्यक्रम होत आहे. शिल्पकार कै. बी. आर. खेडकर यांच्या कन्या शिल्पकार सीमा खेडकर-शिर्के व कुटुंबीयांचा सत्कार, पुतळयाच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन, माहिती फलकाचे अनावरण असा संयुक्त कार्यक्रम होत आहे. यानिमित्त पुतळा साकारण्याचा इतिहास उलगडत आहे.  ‘आशिय खंडातील हा सगळयात देखणी शिल्पकृती आहे.’अशा भावना शिल्पकार खेडकर यांनी पुरस्कार वितरण  समारंभात व्यक्त केली होती.

शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी छत्रपती शिवरायांचा हा पुतळा उभारणीत पुढाकार घेतला. पुतळा उभारणीमागे त्यांचा उदात्त हेतू होता.  छत्रपती शिवरायांच्या विचारकार्याचा वारसा सदैव डोळयासमोर तरळत राहावा, त्यांच्या आदर्शपासून विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा घेत उज्ज्वल करिअर घडवावे हा पुतळा साकारण्यामागींल प्रमुख उद्देश. पुतळा उभारणीसाठी देशभरातील नामांकित शिल्पकारांनी नमुने विद्यापीठाकडे सादर केले होते. यामध्ये पुणे येथील शिल्पकार बी. आर. खेडकर यांनी बनविलेला नमुन्याचा पुतळा साऱ्यांच्या पसंतीस उतरला. तत्कालिन कुलगुरू यांनी शिल्पकार खेडकर यांनी अतिशय बारीकसारीक गोष्टीवर काम करण्याच्या सूचना केल्या.  शिवरायांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या चेहऱ्यावरील भावमुद्रा, पोशाख, आभूषणे यामध्ये कुठेही उणीव राहणार नाही याकडे लक्ष देण्यास सांगितले. विशेष म्हणजे, पुण्यातील मिलिटरी स्कूलमध्ये घोडा आणि स्वार यांचे प्रात्यक्षिक घेतले.

तीन वर्षे पुतळा उभारणीचे काम.

१९७१ मध्ये पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. पुतळा अनेक अर्थी वैशिष्ट्यूपूर्ण आहे. आठ टन वजनाच्या या पुतळयाची पूर्णत: ब्राँझमधील घडण आहे.  चौथऱ्यासह या पुतळयाची एकूण उंची ३६ फूट सहा इंच आहे. पुतळयाची उंची १८ फूट सहा इंच तर लांबी वीस फूट इतकी आहे. या पुतळयाच्या चौथऱ्यासाठी  गुलाबी ग्रॅनाइटचा दगड वापरला आहे. तो आंध्रप्रदेश, तामिळनाडू राज्यतील आण्ला.  पुतळयाच्या चौथऱ्याचे काम कांचीपुरम येथील  डॉ. अमरेंद्र कामत यांनी केले. पुतळयासाठी दगड घडविण्याचे काम तामिळनाडूतील कारागिरांनी केले. या पुतळा उभारणीसाठी समाजाने योगदान दिले. पंचगंगा, वारणा, कुंभी-कासारी, दूधगंगा-वेदगंगा कारखान्यांनी प्रत्येकी साठ हजार रुपये दिले. प्राध्यापक, कर्मचारी व नागरिकांनी मिळून ६६ हजार ५९० रुपये जमा केले. सलग तीन वर्षे काम सुरू होते.  १ डिसेंबर १९७४ रोजी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुतळा अनावरण झाले. हा सारा इतिहास विद्यापीठाने पुस्तकरुपात शब्दबद्ध केला आहे. पुतळा प्रतिष्ठापना सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने शिल्पकार खेडकर यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करत प्रशासनाने कृतज्ञता जपली. शनिवारी, ३० नोव्हेंबर रोजी कुलगुरू डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली व प्रकुलगुरू डॉ. पी. एस पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पुतळा अनावरण सुवर्णमहोत्सव दिन साजरा होत आहे. 

………………………………………………….

शिवमहोत्सवात बी. आर. खेडकरांना जीवनगौरव पुरस्कार

शिल्पकार बी. आर. खेडकर यांना फेब्रुवारी २०११ मध्ये शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीने शिव महोत्सवमध्ये जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. या समारंभासाठी शिल्पकार खेडकर व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. ‘शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात जीवनगौरव पुरस्कारांनी माझा सन्मान झाला, हा आनंद पद्मश्री पुरस्कारापेक्षा मोठा आहे.’अशा भावना खेडकर यांनी व्यक्त केल्या होत्या. शिवरायांच्या नावांनी सुरू असलेल्या विद्यापीठातील छत्रपतींचा पुतळा ही माझी आवडती शिल्पकृती आहे असेही त्यांनी म्हटले होते. त्यावेळी विद्यापीठ प्रशासनानेही खेडकर यांचा सत्कार केला होता.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes