सन्मानजनक निधी द्या, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठक
schedule05 Nov 26 person by visibility 23 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘पंधराव्या वित्त आयोगातील निधी वाटपाच्या असमानतेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.‘ जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्ही ही नागरिकांचे प्रतिनिधीत्व करतो. सन्मानजनक निधी सदस्यांना मिळावा. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्ताधारी घटक पक्षातील प्रमुख पक्ष आहे. ’अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाच्या सदस्यांनी आपल्या भावना मांडल्या.
राष्ट्रवादीचे गटनेते सुधीर देसाई, संग्रामसिंह कुपेकर यांनी सदस्यांच्या भावना जाणून घेतल्या. अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांना सदस्यांचे म्हणणे सांगितले. ‘जिल्हा परिषद सदस्यांना विकासकामासाठी भरीव निधी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सोळावा वित्त आयोगाचा निधी, जिल्हा परिषदेचा स्वनिधी या माध्यमातून सदस्यांना अधिकाधिक निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’असे सदस्यांसमोर त्यांनी स्पष्ट केले. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विकासकामे रखडली आहेत. सदस्यांना जादा निधी उपलब्ध करुन देत विकासकामांना गती द्या असा सूर बैठकीत उमटला. बैठकीला सदस्य राजेंद्र सुर्यवंशी, क्रांतिसिंह पवार पाटील, अमृता डोंगळे, रचना गावडे, दिलीप पाटील, कल्लाप्पाणा भोगण, प्रकाश मुगडे, मनोज फराकटे आदी उपस्थित होते.