नदी पुनर्जीवन प्राधिकरणामार्फत कोल्हापूर महापालिकेला निधी उपलब्ध करावा - भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव
schedule03 Sep 26 person by visibility 73 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापूर महापालिकेकडून दररोज उपसा होणाऱ्या पाण्यापैकी सुमारे 113.04 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर चार एसटीपी प्रकल्पांद्वारे प्रक्रिया करण्यात येते. प्रक्रिया केलेल्या या सांडपाण्याचा प्रभावीपणे पुनर्वापर करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने 204.63 कोटी रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक निधी राज्य सरकारच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी केली.
या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना देण्यात आले. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर झाल्यास शहरातील उपलब्ध जलस्रोतांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून, पाण्याचा शाश्वत वापर, पर्यावरण संवर्धन आणि नदी प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास कोल्हापूर शहराच्या जलव्यवस्थापनाला आणि पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्याने 204.63 कोटी रुपयांचा निधी कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्तरावर उभारणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागामार्फत दि. 27 एप्रिल 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेल्या नदी पुनर्जीवन प्राधिकरणामार्फत प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी कोल्हापूर शहरातील प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली. या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन नामदार पंकजा मुंडे यांनी दिले. यावेळी आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, माजी प्रदेश सचिव महेश जाधव उपस्थित होते.