लढाऊ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना कुसुम पुरस्कार, बुधवारी वितरण
schedule07 Feb 26 person by visibility 29 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्रातील लढाऊ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी येथील मानाचा कुसुम पुरस्कार शनिवारी जाहीर झाला. ५१ हजार रुपये, शाल, बोधचिन्ह असा हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. पुरस्काराचे हे बारावे वर्ष आहे. प्रबोधनकार व विचारवंत इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते बुधवार ११ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी,महालक्ष्मी हॉल, साईक्स एक्स्टेंशन येथे या पुरस्काराचे वितरण दुपारी तीन वाजता होणार आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक प्रा. चंद्रकांत शंकर पाटगांवकर यांनी आयुष्यभर समतेचा विचार समाजामध्ये पोहोचवण्याचे कार्य केले. त्यांच्या मृत्युपश्चात आंतरभारती शिक्षण मंडळ, कोल्हापूर यांच्याकडे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची शिल्लक रक्कम सोपविली. सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, आदी क्षेत्रात हिरिरीने भाग घेणाऱ्या महिलांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या हेतूने कुसुम पारितोषिक देण्यात येते. चंद्रकांत पाटगांवकर यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी ही रक्कम संस्थेकडे सुपूर्द केली. त्याच्या व्याजातून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. आंतरभारती शिक्षण मंडळाच्या पल्लवी कोरगावकर, सुचिता पडळकर, तनुजा शिपूरकर, विनय पाटगावकर,संध्या वाणी यांनी ही निवड केली. या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन या विशेषतः आदिवासी व दलित समुदायांच्या हक्कांसाठी कार्यरत आहेत. त्यांनी, रायगड जिल्ह्यातील कातकरी आदिवासी व गरीब घटकांच्या प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून दिले. भूमी हक्क, रोजगार, शिक्षण आणि सामाजिक न्याय या विषयांवर त्यांनी सातत्याने लढा दिला आहे. मुंबई एसईझेडसारख्या मोठ्या विकास प्रकल्पांना बाधित होणाऱ्या स्थानिकांच्या हक्कांसाठी त्यांनी ठाम भूमिका घेतली. शोषित, वंचित वर्गासाठी आवाज उठवणाऱ्या नेत्या म्हणून उल्का महाजन ओळखल्या जातात. त्यांच्या या साऱ्या कार्याची दखल घेऊन कोल्हापूरचा मानाचा कुसुम पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.