पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना सरकारचा दिलासा; परीक्षा शुल्क माफ
schedule08 Oct 25 person by visibility 182 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पुरामुळे कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाही, याची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. मंत्रालयात राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, अनेक विद्यार्थ्यांचे साहित्य आणि शैक्षणिक साधने पुरामुळे नष्ट झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालये, विद्यापीठे आणि खासगी शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, गणवेश अशा स्वरूपात सामाजिक कर्तव्य म्हणून मदत करावी. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरू राहील.