राजारामपुरीत महापालिकेची धडक कारवाई ! सात हातगाड्या जप्त, अनधिकृत शेड्स हटवले ! !
schedule05 May 26 person by visibility 15 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक तीन व अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी, पाच मे रोजी राजारामपुरी पहिली गल्ली परिसरात धडक कारवाई करत खाऊच्या गाड्या हटवून परिसर मोकळा केला. या कारवाईत ७ हातगाड्या जप्त करण्यात आल्या, तर ४ दुकानांवरील अनधिकृत शेड्स आणि ४ दुकानांचे अनाधिकृत कट्टे तोडून काढण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दुपारी राजारामपुरी जनता बाजार खाऊ गल्ली परिसराला अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा, फुटपाथवर तसेच सामासिक अंतरामध्ये करण्यात आलेले बांधकाम, सार्वजनिक जागेत उभारलेल्या टपऱ्या, खोकी व अन्य अतिक्रमणे केली असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित ठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश आयुक्त भारुड यांनी दिले. या ठिकाणी पार्किंगसाठी राखीव जागेत कोणतेही अतिक्रमण होऊ नये, अशा सक्त सूचना उप-शहर अभियंत्यांना देण्यात आल्या. तसेच व्यावसायिकांनी स्वत:हून आपले अनधिकृत अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा महापालिकेकडून कारवाई करून त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असा इशाराही आयुक्तांनी दिला. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त जयंत जावडेकर, उपशहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत उपस्थित होते.