महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : इचलकरंजीच्या राजकारणात माने गट आणि आवाडे गटातील वाद काही नवीन नाही. प्रत्येक निवडणुकीत दोन्ही गटात कुरघोडी सुरू असतात. नेते मंडळीही एकमेकांवर तोंडसुख घेतात. शनिवारी, या दोन गटातील वाद पुन्हा चर्चेत आला तो,खासदार धैर्यशील माने व आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांच्या वाहनचालकांतील हाणामारीने. वाहनचालकांच्या या हाणामारीवरुन इचलकरंजीसह संपूर्ण जिल्ह्यात उलटसुलट चर्चा उमटत आहेत. पूरस्थितीची पाहणी दरम्यान हा प्रकार घडला.
इचलकरंजी शहराला पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शनिवारी, २७ जुलै रोजी इचलकरंजी दौऱ्यावर होते. पूरपरिस्थिती पाहणीचा दौरा होता. नदीतीरावरुन पाहणी करुन सगळी मंडळी नाट्यगृह येथील पूरग्रस्तांच्या छावणीत पोहोचले. पालकमंत्री मुश्रीफ यांच्या या पाहणी दौऱ्यात खासदार माने व राहुल आवाडे सहभागी होते. नाट्यगृहात पोहोचल्यानंतर चारचाकी वाहने पार्किंग करण्यावरुन वादाला सुरुवात झाली. पार्किंग करत असताना दोघांची चारचाकी वाहने एकमेकाला घासली. यावरुन खासदार माने यांचा चालक योगेश पाटील व आवाडे यांचा चालक मनोज लाखे यांच्यामध्ये वाद झाला. दोघांत शाब्दिक वाद वाढत गेला. दोघेही शिव्या घालत एकमेकांच्या अंगावर धावले. झटापट झाली. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. बेल्टने मारहाणीचा प्रकार घडला. अंगावरील कपडेही फाटले.
दोघेही एकमेकांना आव्हानात्मक भाषा वापरत होते. याप्रसंगी अन्य नेते मंडळीच्या वाहनावरील चालकांनी यामध्ये हस्तक्षेप करत माने व आवाडे यांच्या चालकांना दूर नेले. एव्हाना हा वाद ऐकून पोलिस ही घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासमोरही ते दोघे चालक एकमेकांना उद्देशून शिव्या घालत होते.