महापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले ! सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !
schedule02 Feb 26 person by visibility 7 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी महायुतीने उमेदवार निश्चित केले आहे. महापालिकेच्या ८१ सदस्य संख्येपैकी महायुतीकडे ४६ सदस्य संख्या असल्यामुळे ते पूर्ण बहुमतात आहेत. भाजपचे २६, शिवसेनेचे १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे चार सदस्य असे एकूण ४५ सदस्य आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाचा एक नगरसेवक आहे. जनसुराज्यने महायुतीला पाठिंबा दिला आहे. यामुळे महायुतीचे महापौर आणि उपमहापौर होणार हे निश्चित आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसचे ३४ व शिवसेना ठाकरे पक्षाचा एक नगरसेवक आहे. दोन्ही मिळून महाविकास आघाडीची सदस्य संख्या ३५ इतकी बनली आहे. महाविकास आघाडीने महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आता सभागृहात पाहावयास मिळणार आहे.
‘महायुतीमधील सत्ता वाटपाच्या फॉर्म्युलानुसार पहिल्यांदा भाजपाचा महापौर होणार आहे. महापौरपदासाठी नगरसेविका रुपाराणी निकम या उमेदवार असतील. त्यांच्या रुपाने महापालिकेत भाजपचा पहिला महापौर होईल.’असे भाजपचे नेते व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयात मंत्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक झाली. त्यानंतर मंत्री पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, गटनेते मुरलीधर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद झाली. भाजपकडे महापौरपदासाठी रुपाराणी निकम, विजय खाडे, विशाल शिराळे, प्रमोद देसाई, वैभव कुंभार, विजय देसाई अशी नावे चर्चेत होती. इच्छुकांचे नाव प्रदेश भाजपला कळविली होती. अंतिमत: निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. निकम या दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत.
शिवसेनेकडे उपमहापौरपद आहे. उपमहापौरपद कोणाला ? यावरुन शेवटपर्यत शिवसेनेत चर्चा रंगली. जनसुराज्य शक्ती पक्षाने महापालिकेत शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेत पाठिंबा जाहीर केला. त्या बदल्यात जनसुराज्य शक्ती पक्षाला एक पद देण्याचे ठरले. जनसुराज्यकडून अक्षय विक्रम जरग हे एकमेव नगरसेवक आहेत. यामुळे त्यांच्या नाव जवळपास निश्चित मानले जात होते. दुसरीकडे शिवसेनेतून या पदासाठी प्रयत्न सुरू होते. शिवसेनेला पद मिळावे असा आग्रह काही पदाधिकाऱ्यांचा होता. शिवसेनेचे नगरसेवक सत्यजीत जाधव यांचे नाव उपमहापौरपदासाठी चर्चेत होते. शिवालय येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली अखेरीस जनसुराज्य शक्ती पक्षाचे नगरसेवक अक्षय जरग यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरले. दुपारी साडेचार नंतर शिवसेनेचे पदाधिकारी महापालिकेत येऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी महापौर सुनील कदम, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजीत कदम, नगरसेवक शारंगधर देशमुख, ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. माजी उपमहापौर विक्रम जरग व त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना महापालिकेत गर्दी केली होती. यावेळी जनसुराज्यचे समित कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीत ३५ नगरसेवक निवडून आणत काँग्रेस अर्थात महाविकास आघाडीने ताकत सिद्ध केली आहे. अजिंक्यतारा कार्यालय येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची दुपारी बैठक झाली. आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, नगरसेवक राजू लाटकर, काँग्रेसचे पदाधिकारी सुर्यकांत पाटील बुद्धिहाळकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे नगरसेवक सुनील शेंडे यांचा महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठरले. शेंडे हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. उपमहापौरपदासाठी दुर्वास कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. महापालिका निवडणुकीच्या कालावधीत आरोप, प्रत्यारोप, सभा याद्वारे उभे ठाकलेले महायुती आणि महाविकास आघाडी आता पदाधिकारी निवडीच्या निमित्ताने सभागृहात लढणार आहेत. संख्याबळ महायुतीकडे असले तरी महाविकास आघाडीचा आवाजही कमी नाही हेच दाखवून देण्याचा उद्देश या घडामोडीतून दिसत आहे.