ब्राह्मण सभा करवीरतर्फे ग्रंथदिंडी, ४० वारकरी बालचमूंचा सहभाग
schedule21 Jun 26 person by visibility 13 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: अमृत महोत्सवी ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे श्रीराम कथा आणि श्री राम यज्ञ आयोजित केले आहे. यामध्ये तब्बल ४० बाल वारकरी सहभागी झाले होते.डोक्यावर तुळस आणि टाळ, मृदुंग, विणा तसेच ग्यानबा तुकारामच्या गजरात ही दिंडी मंगलधाम येथून निघाली. त्यानंतर महाद्वार रोड मार्गे जोतिबा रोड वरून दक्षिण द्वार येथून श्री करवीर निवासिनी अंबाबाईस ग्रंथ अर्पण करून या दिंडीची पुन्हा मंगलधाम येथे समाप्ती झाली.
दिनांक २२ जून ते २८ जून २०२६ दरम्यान दररोज संध्याकाळी ४.०० ते ८.३० या वेळेत राम गणेश गडकरी हॉल, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, पेटाळा येथे श्रीराम कथा निरूपण होणार आहे. यानिमित्त पूर्व सकाळी ही दिंडी काढण्यात आली होती. ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष डॉ. दीपक आंबर्डेकर यांच्यासह ब्राह्मण सभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी श्री राम प्रतिमा आणि ग्रंथांचे पूजन करून दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली.
या ग्रंथदिंडीमध्ये हणबरवाडी येथील माऊली भक्त वारकरी विद्यालय येथील वारकरी विद्यार्थी सहभागी झाली होते. ग्रंथदिंडी सोहळ्यास अध्यक्ष डॉ.दीपक आंबर्डेकर, उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी, कार्यवाह श्रीकांत लिमये, सहकार्यवाह श्रीमती अनुराधा गोसावी, खजानीस पूजा जोशी, व्यवस्थापक अशोक जोशी, प्रसाद खाडिलकर, संतोष कोडोलीकर, ॲड.एन.ए.कुलकर्णी,डॉ. उदय कुलकर्णी आदी उपस्थित होते.