कोल्हापुरातील तालमीत साकारणार पैलवान ग्रंथालय, शनिवारी पुस्तक भेट- लोगो अनावरणाचा कार्यक्रम!
schedule20 Nov 26 person by visibility 10 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर कुस्तीची आवड असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील निरा मांजरी येथील तरुणाने आपल्या आईच्या एकसष्ठीनिमित्त कोल्हापुरात ‘पैलवान ग्रंथालय’सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोल्हापूर व जिल्ह्यातील पाच तालीममध्ये ‘पैलवान ग्रंथालय’साठी त्यांनी, वीस पुस्तकांचा संच, एक बुद्धिबळ सेट आणि पुस्तक ठेवण्यासाठी लोखंडी कपाट उपलब्ध करुन देत आहे गिरीश सपकाळ असे त्या तरुणाचे नाव आहे. आई वंदना दत्तात्रय सपकाळ यांच्या एकसष्ठीनिमित्त, शनिवारी २१ नोव्हेंबर २०२६ रोजी तालीम संस्थांना पुस्तके, स्टँड भेट देण्यात येणार आहेत. येथील शाहू स्मारक भवन येथे दुपारी बारा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासंबंधी सांगताना मुख्य समन्यव सपकाळ म्हणाले ‘महाराष्ट्राच्या मातीतील अस्स्ल देशी खेळ म्हणजे कुस्ती. त्या कुस्ती परंपरा आणि आधुनिक ज्ञानाचा संगम पैलवान ग्रंथालयमधून होईल. ‘छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचे निवडक आदेश, महात्मा फुले गौरव ग्रंथ, लोकमाता अहिल्याबाई होळकर चित्रमय चरित्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’तील सिद्धांत, कुस्ती खेळाशी निगडीत पुस्तके, आहारवाटा भारतीय संविधान, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे खंड, मराठी कुमार विश्वकोश, दहावी बारावीनंतर काय, ऑलिम्पिकवीर खाशाबा,’यासह वीस पुस्तकांचा संच पाच तालमींना भेट देण्यात येणार आहे. यामध्ये जयभवानी शाहूपुरी तालीम, राजर्षी शाहू कुस्ती केंद्र शिंगणापूर, राष्ट्रकुल कुस्ती संकुल, सदाशिवराव मंडलिक कुस्ती केंद्र मुरगूड, करवीर कुस्ती संकुल कोपार्डे अशा पाच ठिकाणी ‘पैलवान ग्रंथालय’सुरू होत आहे.’ पत्रकार परिषदेला कुस्ती प्रशिक्षक राम सारंग, शरद जगदाळे, शिवाजी पाटील, रसूल नदाफ, वैभव तेली आदी उपस्थित होते.