इचलकरंजीत वस्त्र संस्कृती विषयक कार्यशाळा, पारंपरिक वस्त्रांचा फॅशन शो
schedule20 Mar 25 person by visibility 165 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत इचलकरंजी येथे वस्त्र संस्कृती विषयक २२ व २३ मार्च २०२५ या कालावधीत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्राची पारंपारिक वस्त्र संस्कृती, वस्त्र संस्कृतीमध्ये होत असणारे बदल, वस्त्र संस्कृतीचे महत्त्व आणि वस्त्र संस्कृतीचे जतन संवर्धन यावर विविध मान्यवरांची व्याख्याने, व चर्चासत्रांचा समावेश आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री अँड. आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली व सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा होत असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे.
२२ मार्च रोजी सकाळी दहा वाजता या कार्यशाळेचे उद्घाटन होईल. पहिल्या दिवशी प्राचीन शैली वस्त्र वारसा यावर विनय नारकर यांचे व्याख्यान होईल तसेच प्रो. अश्विनी अनिल रायबागी यांचे भारतमाता व वस्त्रोद्योग यावर मार्गदर्शन होईल. श्रीमती भाग्यलक्ष्मी घारे हे कोकणातील काथ्या उद्योग यावर भाष्य करतील. तर श्री बाळकृष्ण कापसे हे पैठणी विणकाम आणि बदलते तंत्रज्ञानसंबंधी मार्गदर्शन करतील. श्रीमती केतकी शहा मुक्कीरवार यांचे खण वस्त्र परंपरा आणि त्यातील बदल यावर व्याख्यान आहे.
२३ मार्च रोजी श्रीमती रसिका वाकलकर या ‘पैठणी काल आज आणि उद्या’ यावर मार्गदर्शन करतील. चित्रपट क्षेत्रातील वेशभूषाकार चैत्राली डोंगरे यांचे चित्रपटसृष्टीतील वस्त्रभूषा याविषयी तर प्राचार्य श्रीमती हिरेमठ या बदलती पिढी आणि फॅशन इन्स्टिट्यूट यावर मत व्यक्त करतील. माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे वस्त्रोद्योग योजना मार्गदर्शन या विषयावर व्याख्यान आहे. श्रीमती पौर्णिमा शिरीषकर हे वस्त्रोद्योगातील संधी यावर मार्गदर्शन करतील. २२ मार्चला सायंकाळी "गाणी वस्त्रांची" हा सांस्कृतिक कार्यक्रम संगीतकार अजित परब आणि त्यांचा समूह सादर करणार आहेत. २३ मार्चला पारंपारिक वस्त्रांचा फॅशन शो आयोजित केला आहे.