विविध राज्यातील लोककलावंताकडून शाहू महाराजांना मानवंदना
schedule15 May 23 person by visibility 271 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्यावतीने सुमारे १२० हून अधिक लोककलावंताकडून त्यांच्या कलेद्वारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना मानवंदना दिली.
शाहू मिलच्या सांस्कृतिक सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमामध्ये नाशिक येथील आदिवासींचे बोहडा ,पालघर येथील तारपा , लावणी , कर्बल, लेझीम, सोंगी मुखवटे,डोल्लू कुनिता ( ढोल नृत्य ),दिवली, कोळी आदी नृत्याचे प्रकार यावेळी विविध राज्यातील कलावंतांनी यावेळी सादर केले. प्रा. निशांत गोंधळी यांनी निवेदन सादर केले.
दरम्यान कृतज्ञता पर्व अंतर्गत आयोजित महोत्सवात अंदाजित 1 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची उलाढाल झाली . यामध्ये सर्वाधिक उलाढाल झाली ती आंबा महोत्सव स्टॉलमध्ये सुमारे ३५ लाख रुपयांहून अधिक रकमेचा कोल्हापूरवासिय व इतर नागरिकांनी आंबा खरेदी केला . या कृतज्ञतापर्वात सांस्कृतिक भवन लगत असलेल्या १०८ स्टॉल मधून सुमारे २५ लाखांची; खाद्य जत्रेत १७ लाख ; कापड विभागामध्ये १५ लाख तसेच बुक आणि इतर स्टॉलद्वारे सुमारे २० लाख रुपयांहून अधिकची उलाढाल झाली.
दरम्यान महोत्सवातील विविध कार्यक्रमासाठी कृतज्ञता पर्व संयोजन समिती सदस्य प्रमोद पाटील, आदित्य बेडेकर,प्राचार्य अजेय दळवी, उदय गायकवाड, प्रा .डॉ.महादेव नरके, ऋषिकेश केसकर, जयदीप मोरे , डॉ . कविता गगराणी , सुखदेव गिरी,प्रसन्न मालेकर वसीम सरकवास, संदेश जोशी यांच्यासह विविध संस्था, संघटना प्रतिनिधींचे सहकार्य लाभले.