विद्यापीठाची स्थापना, बाळासाहेब देसाईंचा खमकेपणा, सरकारची कमिटी अन् नावावर शिक्कामोर्तब !
schedule14 Mar 25 person by visibility 371 categoryशैक्षणिक

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.शिवाजी विद्यापीठ ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामविस्तार करावे अशी मागणी होत आहेत. विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित झाला. मात्र हे करत असताना विद्यापीठाच्या स्थापनेचा इतिहास, तत्कालिन घडामोडी, शिवाजी विद्यापीठ हेच नाव निश्चित करण्यामागील उदात्त विचार, विद्यापीठासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनी, या साऱ्या बाबींवर दृष्टीक्षेप टाकला तर ‘शिवाजी विद्यापीठ’हेच नाव योग्य आहे हाच विचार दृढ होईल.
दक्षिण महाराष्ट्राच्या प्रादेशिक गरजा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय झाला. १८ नोव्हेंबर १९६२ रोजी भारताचे तत्कालिन राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. सुरुवातीच्या कालावधीत विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे पाच जिल्हयाचे होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि रत्नागिरी असे पाच जिल्हे विद्यापीठ कार्यक्षेत्रात समाविष्ठ होते. ३४ कॉलेजिअस संलग्न होती. विद्यापीठ कॅम्पसमध्ये पाच अधिविभाग होते. आणि विद्यार्थ्यांची संख्य होती, चौदा हजाराच्या आसपास.
छत्रपती राजाराम महाराज, प्राचार्य बाळकृष्ण यांची ईच्छा होती, की कोल्हापुरात विद्यापीठाची स्थापना व्हावी. प्राचार्य बाळकृष्ण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावांनी विद्यापीठ सुरु करावे अशी भूमिका मांडली होती. पुढे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी विद्यापीठ स्थापनेत पुढाकार घेतला. विद्यापीठ साताऱ्यात व्हावे अशी, यशवंतराव चव्हाण यांची ईच्छा होती. तर वसंतदादा पाटील यांना सांगलीत विद्यापीठ असावे यासाठी प्रयत्न होते. विद्यापीठाच्या जागा निश्चितीचा विषय होता. कॅबिनेट पुढे हा विषय होता. नेमके त्यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई आजारी होते. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. कॅबिनेटमध्ये विद्यापीठाच्या जागा निश्चितीचा विषय व विद्यापीठ आपआपल्या जिल्ह्यात सुरू व्हावे यासाठी नेते मंडळींचे सुरू असलेले प्रयत्न याची वार्ता देसाई यांना लागली. हॉस्पिटलमधून ते थेट यशवंतराव चव्हाण यांना भेटायला गेले. कोल्हापुरात विद्यापीठ होणे का गरजेचे आहे हे पटवून दिले. आणि विद्यापीठ जर कोल्हापुरात होणार नसेल तर माझा मंत्रीपदाचा राजीनामा घ्या असे म्हणत त्यांनी त्यासंबंधीचे पत्र दिले. यशवंतराव चव्हाण यांनी, देसाई यांना, ‘विद्यापीठाचा निर्णय तुमच्या मनासारखा होईल.’ या शब्दांत आश्वस्त केले. आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला मिळले.
विद्यापीठ कोल्हापूरला मिळाले. पण त्यासाठी भरपूर जागा आवश्यक होती. विद्यापीठ परिसरात त्याकाळी जगदाळे, सरनाईक, पायमल, साळुंखे, थोरात, मंडलिक, माने यांना शेतजमिनी होत्या. विद्यापीठ साकारणार, बहुजनांची मुले शिकणार म्हणून या शेतकरी कुटुंबातील मंडळींनी आपल्या शेतजमिनी दिल्या. विद्यापीठासाठी निधी उभारण्यात अनेकांनी पुढाकार घेतला. त्यावेळी केशवराव जगदाळे हे नगराध्यक्ष होते. त्यांच्यासह रामभाऊ उबाळे, डी. एस. नार्वेकर, हिंदुराव साळुंखे, बाळ साटम, काका राऊत, ए. आर. साळोखे आदींनी पुढाकार घेत निधीही जमविला होता. तालीम संस्थांनी विद्यापीठाच्या माळरानावर श्रमदान करत जमीन तयार केली होती या इतिहासाचे साक्षीदार असलेले असंख्य मंडळी आजही हयात आहेत.
विद्यापीठाचे नाव काय ? शिवाजी विद्यापीठ की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ , हा विषय तेव्हाही चर्चिला गेला होता. छत्रपती शिवरायांची प्रेरणा सदैव मिळत राहावी, त्यांचे नाव सदैव ओठी रुळावे म्हणून शिवाजी विद्यापीठ हेच नाव योग्य आहे असे यशवंतराव चव्हाण यांनी स्पष्ट केल होते. कोल्हापूरचे पहिले आमदार बळवंतराव बराले यांनी त्याकाळी नामविस्ताराची मागणी केली होती. दरम्यान यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना, ‘शिवाजी विद्यापीठ’ या नावात आदराची भावना आहे हे पटवून दिले. शिवाय नामविस्तार केला तर शॉर्टफॉर्म तयार होऊन विद्यापीठाचे मूळ नाव गायब होईल हे त्यांनी विविध संस्थांची उदाहरणे देत निदर्शनास आणले. यामुळे नामविस्ताराचा आग्रह धरणाऱ्या मंडळींचा विरोध मावळला होता. शिवाय सरकारनेही, विद्यापीठाची रचना व नाव निश्चिती यासंबंधी अकरा जणांची समिती स्थापन केली होती. प्राचार्य सी. रा. तावडे यांच्या नेतृत्वाखाली ही समिती होती. या समितीनेही शिफारस केली होती की, ‘शिवाजी विद्यापीठ’हेच नाव योग्य आहे. विद्यापीठ स्थापनेला सहा दशके उलटली. या कालावधीत शिवाजी विद्यापीठाने ‘लोकल टू ग्लोबल’अशी झेप घेतलीय. ‘आमचं विद्यापीठ...शिवाजी विद्यापीठ’हा भाव प्रत्येकाच्या मनी रुजलाय.