महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (३० मे २०२३) खेळीमेळीत झाली. संस्थेचे उपाध्यक्ष नामदेवराव कांबळे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सभेपुढील विषय क्रमांक पाच नुसार संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ आणि संस्थेचे सहसचिव (अर्थ) एस.एम.गवळी यांना मुदतवाढ देण्यात आली. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे सभा झाली.
संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी प्रास्ताविक करताना शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या त्यागातून ही संस्था उभी राहिली आहे. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्काराची ज्ञानज्योत प्रज्वलित करण्यासाठी गुरुदेव कार्यकर्ते झटत आहेत. अनेक अडचणी, समस्या, संकटे येत असली तरी संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. नवीन शिक्षण धोरणामध्ये अनेक बदल अभिप्रेत असून संस्थेच्या सर्व संस्कार केद्राचे डिजीटीलायझेशन करावे लागेल, असे विचार मांडले.
कार्याध्यक्ष साळुंखे यांनी सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेचे वाचन केले. मागील सर्वसाधारण सभेचे प्रोसिडींग वाचून कायम करण्यात आले. संस्थेच्या २०२१-२२ चा अहवाल, ताळेबंद, ऑडिट रिपोर्ट, उत्पन्न खर्च पत्रके आणि २०२३-२४ च्या एकत्रित अंदाजपत्रकास एकमताने मंजूरी देण्यात आली.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी २०२१-२२ मधील संस्थेच्या विकास कामांचा आढावा घेणाऱ्या अहवालाचे वाचन केले. त्यामध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, जॉब प्लेसमेंट, पुणे-मुंबई-बेंगलोर येथील कंपन्यांबरोबर केलेले सामंजस्य करार,शिक्षकांसाठी आयोजित केलेले प्रशिक्षण वर्ग याबाबत सविस्तर आढावा घेतला. तसेच नव्याने मान्यता मिळालेल्या दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज, इचलकरंजी, मिरज येथील बी.फार्मसी. कॉलेज आणि सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंगची माहिती दिली.
सभेत एच.के.प्रताप यांनी संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला त्यास मा.आर.ए.भोजकर यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते हा ठराव मंजूर करण्यात आला.
संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ यांनी मनोगत मांडले. संस्थेचे सहसचिव (अर्थ) प्राचार्य एस.एम.गवळी यांनी आभार मानले. प्रभारी प्राचार्य डॉ. महेश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, मा.अविनाश पाटील, संस्थेचे ऑडिटरविक्रम फाटक, ॲड. हितेश राणिंगा आदी उपस्थित होते. प्रारंभी गायक महेश हिरेमठ यांनी संस्थेची प्रार्थना सादर केली.