दिलबहारचा पराभव करत पाटाकडील उपांत्य फेरीत
schedule28 May 23 person by visibility 281 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
येथील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळ अ संघाने दिलबहार तालीम मंडळाचा ४-० असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केली आहे.
पाटाकडील आणि दिलबहार यांच्यातील सामना एकतर्फी झाला. पूर्ण सामन्यावर पाटाकडीलचे वर्चस्व होते. पूर्वार्धात पहिल्या अर्धा तासाच्या खेळात दोन्ही संघांनी आघाडीसाठी जोरदार प्रयत्न केले. त्यानंतर ३६ व्या मिनिटाला सोमाडीने मैदानी गोल करत पाटाकडील संघाचे गोलचे खाते खोलले. मध्यंतरास पाटाकडील संघ १-० असा आघाडीवर होता. उत्तरार्धात पाटाकडीलला चांगली लय सापडली. ४६ व्या मिनिटाला सोमाडीने वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल नोंदवला. दोन गोलच्या आघाडीनंतर पाटाकडीलच्या आक्रमणाला धार चढली होती. साठाव्या मिनिटाला पाटाकडीलला फ्री किक मिळाली. फ्री किकवर ओंकार मोरे याने मारलेला वेगवान फटका वेगाने गोल जाळ्यात गेला.गोलरक्षकाला बचाव करण्याची संधीही मिळाली नाही. १९ व्या मिनिटाला ओंकार मोरे यांनी वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथा गोल नोंदवला. पूर्ण वेळेत चार गोलची घसघशीत आघाडी कायम टिकत पाटाकडीलने उपांत्य फेरीत प्रवेश केला . पाटाकडीच्या ओंकार मोरे याची सामनावीर तर दिलबहारच्या व्हॅलेंटाईनची लढवय्या खेळाडू निवड झाली.
सोमवारचा सामना,
बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, दुपारी चार वाजता.