पर्यटन व्हिलेज स्पर्धेत पाटगावला राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक
schedule27 Sep 23 person by visibility 360 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गाव पाटगाव’ म्हणून विकसित होत असलेले ‘पाटगाव’ हे कांस्य पदक विजेते गाव ठरले आहे. राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत महाराष्ट्रातून एकमेव पाटगावची निवड झाली आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट व पर्यटन विभागाच्या सचिव व्ही. विद्यावती यांच्या हस्ते देण्यात आलेला हा पुरस्कार पर्यटन विभागाच्या पुणे विभागीय उपसंचालक शमा पवार, महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी, पाटगावचे सरपंच विलास देसाई, मधपाळ वसंत रासकर यांनी स्वीकारला.
शाश्वत विकासाचा पथदर्शी प्रकल्प राबविणाऱ्या पाटगावची सामाजिक, नैसर्गिक, आर्थिक निकषाच्या आधारे या स्पर्धेसाठी निवड झाली होती. देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ७५० हून अधिक गावांमधून केवळ ३५ गावांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. यापैकी ५ गावांना सुवर्ण, १० गावांना रौप्य तर २० गावांना कांस्य पदक मिळाले आहे.