कोल्हापुरात चार जूनला नांगरट साहित्य संमेलन ! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार !!
schedule16 May 23 person by visibility 181 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे चार जून २०२३ रोजी कोल्हापुरात पहिले ‘नांगरट साहित्य संमेलन’होत आहे. शेती आणि शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आयोजित हे संमेलन येथील विवेकानंद कॉलेज येथे होत आहे. या एकदिवसीय संमेलनाचे उद्घाटन वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती माजी खासदार व स्वागताध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.
कवी विठ्ठल वाघ हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. सकाळी होणाऱ्या उद्घाटन सत्रात स्वागताध्यक्ष शेट्टी, उद्घाटक फुटाणे, निमंत्रक कवी संदीप जगताप, आणि संमेलनाचे अध्यक्ष वाघ हे मनोगत व्यक्त करणार आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये ‘शेतकरी प्रश्नांचे साहित्य, कला, माध्यमे व राजकारण यात उमटलेले प्रतिबिंब’या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादाला पत्रकार निखिल वागळे, इंद्रजित देशमुख, चित्रपट निर्माते-अभिनेते प्रवीण तरडे सहभागी होणार आहेत. तिसऱ्या सत्रात कवी प्रा. सुरेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी कवी संमेलन होणार आहे.
शेट्टी म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, शेतकऱ्यांच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी आंदोलनाची दिशा ठरावी या मुख्य उद्देश आहे. येथून पुढे दरवर्षी जून महिन्यात नांगरट साहित्य संमेलन आयोजित केले जाईल.’