सुरेल वादनाने रसिक तल्लीन, कलाश्री महोत्सवाला प्रारंभ
schedule21 Sep 23 person by visibility 160 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बासरी, सतार आणि व्हायोलिनच्या सुरेल वादनाने रसिक तल्लीन झाले. या तीन वाद्यांचा स्वराविष्कार कलाश्री महोत्सवाच्या प्रारंभाला झाला. दि न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित रसिकाग्रणी मदन मोहन लोहिया सांस्कृतिक मंच व मीना विनोद लोहिया संगीत अॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महोत्सवाचे आयोजन केले आहे. रामगणेश गडकरी सभागृह येथे महोत्सव होत आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बुधवारी, २० सप्टेंबर रोजी सतारवादक अजित कुलकर्णी यांनी सतार, सचिन जगताप यांची बासरी तर केदार गुळवणी यांनी व्हायोलिन वादन झाले. त्यांना संदेश खेडेकर यांनी तबला साथ केली. अजित कुलकर्णी यांनी सतारीवर मोगरा फुलला हे गीत तर केदार गुळवणी यांनी श्रावणात घन निळा बरसला आणि सचिन जगताप यांनी बासरीवर ज्योती कलश झलके हे गीत सादर केले. दुसऱ्या सत्रात नृत्यार्पण सत्रात वर्षा खाडिलकर व निधी आलासे यांनी भरतनाट्यम व कथ्थकनृत्ये सादर केली. भरतनाट्यममध्ये गणेश पंचरत्न, नाट्यमंजिरी, पुषांजली, रंजनी असे नृत्य प्रकार सादर केले.
दरम्यान दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे विनोदकुमार लोहिया, अनिल लोहिया, निर्मलकुमार लोहिया, सुधीर लोहिया, संजीव कुलकर्णी, डॉ. शीतल धर्माधिकारी, प्राचार्य प्रभाकर हेरवाडे, सुर्यकांत चव्हाण, डॉ. ज. ल. नागावकर, शीलादेवी लोहिया, डॉ. नंदकुमार जोशी उपस्थित होते.
……………….
गुरुवारी पद्मजा फेणाणी-जोगळेकरांची मैफल
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी (२१ सप्टेंबर) प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांची भावगीत व भक्तीगीत गायनाची मैफल होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता मैफलीला प्रारंभ होईल.