गोकुळमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
schedule09 Mar 25 person by visibility 210 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ व कोल्हापूर जिल्हा सहकारी कर्मचारी संघटना आयटक यांच्यावतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गोकुळ प्रधान कार्यालयामध्ये महिला मेळावा व विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. चेअरमन अरुण डोंगळे हस्ते व संघाच्या संचालिका अंजना रेडेकर, महिला फेडरेशनच्या अध्यक्षा कॉम्रेड स्मिता पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला.
चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले , ज्या घरात स्त्रीला सन्मान मिळतो तिचे नैसर्गिक हक्क तिला दिले जातात त्या घरात खऱ्या अर्थाने गोकुळ नांदते. कारण स्त्री हीच आई, बहिण, पत्नी, मैत्रीण अशा अनेक रुपात पुरुषांना आणि समाजाला उर्जा आणि प्रेरणा देत असते. सबला आणि सक्षम स्त्रिया हे निरोगी समाज व्यवस्थेचे लक्षण आहे.
महिला फेडरेशनच्या अध्यक्ष स्मिता पानसरे यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सावित्रीबाईंनी केलेले कार्याची माहिती सांगितली. अतिरिक्त पोलीस प्रमुख जयश्री देसाई यांनी निर्भया पथकाची माहिती दिली. डॉ.रेश्मा पोवार यांनी महिलांनी स्वतःचे आरोग्य सांभाळावे व पैसा स्वतःच्या आरोग्यासाठी राखून ठेवावा असे आवाहन केले. याप्रसंगी गोष्ट एका तासाची ही नाटिका सादर करण्यात आली. गोकुळ दूध संघाच्या प्रागंणामध्ये महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण केले.
मृण्मयी सातवेकर यांनी स्वागत केले. जनरल सेक्रेटरी शाहीर सदाशिव निकम यांनी प्रास्ताविक केले. संघटनेचे अध्यक्ष मल्हार पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, महाव्यवस्थापक मार्केटिंग जगदीश पाटील, महिला नेतृत्व विकास प्रमुख मृण्मयी सातवेकर, संपदा थोरात, माधुरी बसवर, राजश्री चव्हाण, रुपाली देसाई, निलम कवठेकर, गीता मोरे, डॉ.अश्विनी टारे, सुनिता कांबळे, शुभदा पाटील तसेच, बाजीराव राणे उपस्थित होते.